पंखपार: 2007

Sunday, April 15, 2007

काळवेळ

१.
काळ वेळ तुडवून
खुप लोक निघून गेलेत
चपलांचे व्रण कहाण्यांन्वर
अता हळू हळु रुजू लागलेत

२.
पत्ता शोधत येणार्याला
कसे सांगावे?
शेवटचे कलेवर गाडुन
गाव पुन्हा गर्भार आहे
वेशिवरती बुद्ध
डोळे मिटुन हसतो आहे?

३.
डोळे किलबिलत असतात
कोसळणार्या द्रव्यव्रुत्ती
कटोर्यामधली कोवली घरटी
अपरंपार करूणेने धरावी
लागतात घटोत्कची विजे पुढती...

४.
काळ वेळ सोडवत जाते
गुंत्यात हरवलेला प्रहर
दिवा घेऊन साजरा करायचा
रसरसणारा अंधार बहर

निळा पैलू

उगवलोच आहे आभाळखाली
पण्रंगविहीन...
टाका घालणारा पक्षी
काळा असला तर असूदे
एखादा निळा पैलू
त्याच्या चोचीत असेलच ना?

हे गळणार्या पानांन्नो
देठमिठीची उकल सापडली तुम्हाला?
मग हे मौनव्रत का?
गाठपर्व माझेही ऐन मध्यावर आहे...

अवतीभवती ती येइल
तेंव्हा झाडांन्नो एक करा
सळसळू नका.
तीची चाहूल न लागल्याचा बहाणा
मग तीला पटत नाही

Saturday, April 14, 2007

एकटा तारा

असे स्मरणातले फूल उमले
पाकळीत गहिरा गंध
वाळल्या खोडावर ढोली कोरी
त्या चोचीची उरावर थाप

वेडात पिसे
विस्कटले घर सारे
शरीरात शोधतो पुन्हा
स्पर्शाचे लुप्त इशारे

ह्या पसरल्या चांदण्यात
पुन्हा विणतो
गाण्याचा धागा
तुझ्याविना तुला भोगताना
मी उरतो निळाईत
हरवलेला क्षितीजस्थ
एकटा तारा...

उसासा

हा कुंद पाकळ्यांचा उसासा
अंधार मंत्रावे तसे
पापणी पापणीत मिटले
सखे तुझ्या जे
सुख ओठास भिजवते

कवडशांचे हे चोरटे
स्पर्श उतरले जिथे
अजून तुटते पाखरांची
स्पर्शमाळ देहकांतीवर तिथे

बर्फाचे शुभ्र बोचणाऱ्या
अंतरात कित्येक ज्वाळा
सखे तुझ्या दिशेतून येतो
रेशीम उधळणारा वारा



सुखाच्या जखमा

ह्या माझ्या दुख: कायेवर
अंतरा अंतरावर
सुखाच्या जखमा...
खपली खाली
काय धरून बसल्या आहेत?
क्षणांचे शहार ?
जपणे म्हणजे राखणे असतेच असे नाही
हरेक दारा आडुन
चोरून बघणार्या डोळ्यांनो
तुमच्यतही ओतप्रोत भरली आहेत युद्धे
पक्षी निघून गेलेले झाड
तुम्ही आणि मी
सगळेच घायाळ आहोत...