पंखपार: February 2008

Tuesday, February 26, 2008

तत्वद्न्यान

त्याच्या वरून जिव ओवाळताना
तू जळणे स्विकारलेस
प्रकाशाच्या शोधात असलेल्या त्याने स्विकारले
तुझ्या उजेडात एक संन्यस्त तत्वद्न्यान
ह्या तिरळ्या विरोधाभासात
कुणाला दिसले शोषण
हत्तीच्या वजनाइतकी अर्थशुन्यता
आंधळी मुर्खता
जाणवले त्यातले अप्रिहार्यत्व
असफ़ल एकतर्फी प्रेमहि कदाचित
सगळ्यानी निवडले तीन दगडातील दोन
उभे रहाणे महत्वाचे वाटले कदाचित त्याना
तू मात्र त्याच्यासाठी जळत राहीलीस
तोही त्याच उजेडात संन्यस्त राहीला...

राधा


मागे एकदा तू म्हणालीस
"मी राधा आहे"
त्या नंतर तुला पिचताना पाहत आलो...
पदरा खाली मांजरांना जपताना पाहत आलो
तुझ्या मिठीचे कित्येक रस्ते
देवळात गेले...
कित्येक रस्ते
निनावी पायऱ्यांच्या महालात गेले...
डोळ्याभोवती वर्तुळे आली
कित्येक दिवस वर्तुळातून
किडके दात कोरण्यात गेले
भिंतीचे पापुद्रे झाले
तरी कॅलेंडरावरचे तुझे हिशेब काटेकोर आहेत...
पण जन्मतारखांचे पिवळे आकडे त्यांचे काय?
तुझे रविवारी नहाणे
सैलसर अंबाडा घालून देवपूजा करणे...
तेव्हा म्हणतेस "मी तुझी राधा आहे"
आठ पाचाची लोकल पकडताना,
ऑफिसात साहेबाची बोलणी ऐकताना
तुझ्या मिठीतील कृष्णपण
रिकाम्या घरासमोरची बकरी होते...
तेव्हा न चुकता तू म्हणतेस
"मी तुझी राधा आहे"

Thursday, February 21, 2008

व्यर्थ शब्द

व्यर्थ जाळले शब्द
धुरात त्यांच्या चुरचुरले नाही डोळे
आंधार दिला भाड्याने अशा
चेहर्यावर मिणमिणत्या खिडक्या...
(म्हणे) व्यर्थ आहेत शब्द
ज्याला सुराची साथ नाही
मस्तवाल रसिकतेला त्यांच्या
विषाचा तिरकट दात आहे....
सजवायला ? बघा दुसरे
शब्द ना माझे गुलाबचंदी
अघोर साधनेत ह्यांच्या
काळिजे कोवळी कटणार आहेत
व्यर्थ! तुमची भीक
माझ्या हात काटलेल्या शब्दाना
संगमरवरी ताज त्यांनी
केंव्हाच बांधला आहे...

माणूस

माणसाच्या हातातील भिंगे
लक्षपुर्वक जाळत आहेत
इथेच, माणसाना...
तिरस्काराचे सुर्य
पाळलेत त्यानी
स्वत:च्या डोळ्यातून
माणसांच्या जळण्याला
वणवा म्हणणारे
आहेत अरण्याच्या शोधात: वनवास भोगत?
जागो जाग
सोन्याची कातडी
विकावयास बसलेले
राम-
भोलाराम, आत्माराम,सखाराम
जपणार्या बायका
हाडाशी तशाच उघड्या!
काय करायचे?
तिरस्काराचे सुर्या विझवून
आंधळ्या झालेल्या लोकांना
करत्रुत्वाचे अहंकार होतात
ह्याला काय म्हणायचे?
माणुस...?