पंखपार: November 2008

Tuesday, November 11, 2008

प्रार्थना

तु विकास तु मार्ग
तु बळ पावलातले
तु दगड वाटेवरचे
तुच रणाणते उन
आतले बाहेरचे...

तु सावलीचा विसावा
ओलावा पाण्याचा
ओठातल्या, डोळयातल्या
तु विश्रांतीची मिठी
तुच स्वप्नांना पडलेली भीती
जखडणारी, जिद्दवणारी...

तु कर्तुत्वाची नशा
तुच पोखरणारी निराशा
कुठला कोश कुठले फुलपाखरू?
तु प्रष्णाचे गर्भ,
अन उत्तरांचा फोलपणा...

नमस्काराचि भावना तु
नास्तिकाची प्रार्थना
जिथे विरोधाभास जन्मतो
तुच निवळ प्रेरणा...

वाडा

जुन्या वाड्यांच्या दारावरील
सायकलिंच्या ढिगासारखे
एकात एक गुंतून पडलेले विचार
घेउन बसलो आहे...

अर्गोनोमिक साहित्य
लिहिण्याच्या आजकालच्या विनंत्या
'मान द्या (नाहितर कापून घेइन)'
अशा जाड अक्षरानी पार वाकलेल्या

नवी कल्पना निसर्गतःच वस्त्रविरहीत
की बघितल्यावर विसरता विसरत नाही
शब्द विस्फारण्या साठी करेक्ट फोन्ट
अशावेळी कधीही सापडत नाही...

वापरलेल्या वस्तू विकणारे दुकान
डोक्यात उघडुन बसलो आहे
आजची जाहीरातः
' लाज वापरून झाली असेल तर आणुन द्या
टॅक्स मधे सुट किंवा लंगोटी तरी मिळवा '
हा कुणाचा तरी वापरलेला जोक; पुन्हा वापरला
तुम्ही वापरलेल हसण; पुन्हा वापरलत?

जुन्या वाड्याच्या अंगणासारख
कहीतरी असत सायकलीच्या ढिगा पल्याड
लंगडी घालणारे पाय आणले असतील
तर डाव रंगेल,
भाग्यात असेल तर समोरच्या काकुंचा
रियाजी ओरडाही मिळेल ...

पण त्या आधी वाडा कुठाय हे माहीती आहे का?

पायांनो

उधळलेल्या वाटा गेल्या
बदनाम करून पायाना
रुजण्याचे स्वप्नच त्यांचे
कालबाह्य झालेले...

इथली गाणी, वाणी, पेहराव, लकब लादुन गेली शरीरे
दूर क्षितीजावरची गाणी, वाणी, पेहराव, लकब लादून आली शरीरे
रुजलेले पाय तेंव्हा
फुलांच्या निर्मितीत गढले होते (हाऊ बोअरींग)

जाणारे घेउन गेले धार धार पाते
येणारे घेउन आले धार धार पाते
बुद्धीचे भुकेचे भिकेचे
रुजलेले पाय
इथले अन क्षितीजापलीकडले
एकाच घावाचे सहप्रवासी...

माझ्या पायानो कृपा करा सुजा पण रुजु नका

पाऊसवेळा

घर खिडक्यांवर
ओघळते सांज वेळ ओली
मन शब्दसाय व्हावे
अशी पावसाची बोली

माझ्या देहभानाचे उंबरे
पल्याड पावसाचा कडा
हवी उसनिशी झेप
किंवा कडेलोट हवा

ह्या पावसाला खोड
मनी घालतो पसारा
सापडला मला मग
माझा कोंडणारा गळा

ह्या पाउसवेळेला
माझ्या भावनांचे शहर
कातर भयाने ऐके
आद्य-हिरवे गजर...