पंखपार: March 2010

Sunday, March 21, 2010

चुकलेला एकताल

ह्या असह्य शहरात
माणसांची चाके झाली आहेत
त्यांना धावायला रस्ते लागतात
डांबरासारखेच तत्त्वज्ञान!
गल्लोगल्ली 'बाबा माता टायर मार्ट'

चिरपरिचित शहराचे अज्ञात कोपरे
एकत्र जोडलेले भयाने
बस नंबर ३२ स्वप्ना पासून लाचारी पर्यंत
केवळ पाच थांब्यात

ह्या शहरात कान देऊन ऐकाल तर
कळेल घराघरातून नाचतायत
कातडीवर बोटे
एकतालाच्या पळवाटेवरदेखील चुकलेली

शांतता

शांततेवर लोंबणारा हा दोर कसला ?
ज्याचा पीळ ओळखीचा आहे
भास ओळखीचा आहे
मानेभोवतालीचा पेड
माझा आकांत भोवरा आहे.

ह्या शांततेचा स्पर्श
किती मुखानी बोलतो
जिभेत दुधारी पात्यांचा
दंशात उमरल्या दातांचा
माझा एकांत जबडा आहे.

शांततेच्या यमदुतान्नो
हृदयाचे माझ्या संपलेत कधीच ठोके
मोकळ्या देहातले पैंजण कसे
सतःतच रमले आहे?

शांततेच्या टोकावरती
तिक्ष्ण हत्यारी राने
काळजास फाडणारी त्यांना
चांदण्याची धार आहे

हात

दारात माझ्या कुणाचे कुणाचे हात
उतरतात मुककाम करतात
कधी देण्यासाठी कधी घेण्यासाठी
कधी नुसतेच सहवासासाठी
माझे दार तसे एकटेच आहे
हे हात सोडून गेलेल्या तमाम
माणसांन्नो तुमची उचलायची ओझी संपली आहेत काय?
तुमच्या भाग्यरेशावर पोसलेले माझे भाग्य
माझ्या दारावर लट्कलेल्या "हस्तसामुद्रिक" पाट्या
आणि तुमच्या हाताखालचा अंधार हे सारच पोकळ आहे....

चंद्र-कळा

चंद्र फुलांचे हार गळा
रात्र सजविशी अंग-कळा || धृ. ||

धुंद धुंद मन, बहर-बंध तन
स्पर्श रेशमी, घुसमटतो घन
छेड काढता, लटक्या रागे
म्हणसी मजला 'कृष्ण-काळा'! || १ ||

देह उमलले, मिठीत रमले
श्वास केतकी, गुंफून पडले
रात्री मधूनी, कळीकाळाच्या
रंगला हा रास खुळा || २ ||

एकतनुता, एकतानता,
द्वैत मिटले, दोघांकरता
आसक्तीच्या मैफीलीतह्या
जीव भोगे ब्रह्म-कळा || ३ ||