पंखपार: 2011

Sunday, November 6, 2011

जातकुळी

काही वर्षापूर्वी बार्न्सच्या पुस्तकभांडारात
आवडतीच्या सिंगलशॉट मोका सकट मी.
दिशाहीनतेचे डर्टी हॅरी फोर्टी फोर मॅग्नम खेळवत...
आजूबाजूची टेबले एकटेपणाच्या गर्दीने व्यापलेली
तेव्हा भेटले होते पहिल्यांदा दहा तोंडाचे ते मूल
लॅगरांज बिंदूचा रोग झालेले...
लहानपणी आईने सांगितलेली धृवाची कथा...
अढळपदातला अध्याहृत बंदिवास...
डर्टि हॅरी रोखल्यावर आत्मभानाला सुटलेली घाण
ह्यांच्यात बुडवून घेतले होते सारे वेडेबागडे शब्द
दहा तोंडाच्या मुलाने रचलेल्या रचना
रोशोमान सावल्यांचा खेळ...
माझे हरवलेले डर्टी हॅरी, विभक्त झालेले एकटेपण
आणि फोस्टर केअर मध्ये असलेले ते मूल
माझा अढळपदाकडाचा बुर्ज्वा प्रवास
कालच्या पानावरून पुढे आता निर्धोक....

Wednesday, August 31, 2011

बाहुली

दिवा सरकव कोपऱ्यात
हा अगणित तहानलेला अंधार
घडी घातलेले पाय पोटाशी घेऊन
ह्या सर्वव्यापी काळ्या रात्रीत
ती निथळत उभी आहे
शब्दांनी न सांगता
इवले इवले हात तिच्यापुढे धरले
तिच्या हातात दहा दिशांच्या जत्रांतून आणलेल्या ह्या रंगीबेरंगी बाहुल्या
त्यांच्या डोळ्यात भाव शिवले आहेत
त्यांचे ओठ अजाण वेदनेच्या टाक्यांनी बहरले आहेत.

देहवीणा वाजविणारी बोटे
तुझ्याच पोतडीत सापडतील
तुला गाणे कधीच समजले नाही
'पाच तारांची' ओळख कधी सरली नाही
घर झडभर शिशिराचे पानपाचोळे बघत
खिडक्यांची दारे दर पावसात फुगतात
तसा ह्या दूर अनोळखी देशात... मी...
हे असंख्य तुकडे झालेले देहभान कसे सांधावे?
बाहुल्यानो शिकवाल का टाके कसे पेलावे?

खळखळून हसणारे अनेक चेहरे
त्यावरचे डोळे ख्रिस्ताच्या खिळ्यांची आठवण करून देतात
दोन्ही लुकलुकतात,
वेदनेच्या तळ्यावरील कवडशांसारखे
कापडी शरीरातील धडधडणारे हृदय
त्याच क्षणी गोळीबंद शीळ घालते
माझ्या दारासमोर उभा असलेला मॅपल
भगवा होताना क्षणभर स्तब्ध होतो
क्षणभरच...

गुंडाळशील ना व्यवस्थित हे काचेचे कोमलपण?
खळकन फुटले तर विषारी इजाही करेल...
डोळ्यात पाणी भरण्याचे दिवस आले की
हमखास एखादा कावळा समोरच्या फांदीवर येतो
बाहुली नटून-थटून चौकटीत येते
आणि घड्याळासारखा मी फिरत राहतो
पंख झडतात, बाहुलीचे रंग सुरुकुततात
चौकटी मात्र अधिकाधिक बळकट होतात
ठराविक ठिकाणी माझे गजर तसेच होत राहतात

निथळणारी तशीच तू का उभी आहेस?
ह्या थारोळ्यात माझीच उमटत आहेत
अज्ञात, भयावह प्रतिबिंबे
खालचे अटीतटीने सारवलेले हे अंगण
माझे परिटघडीचे बोलघेवडेपण
सारे तुझ्या तळव्याखाली लगदा होत आहे
तुझ्या डोळ्यात अजून एक बाहुली गवसल्याचे समाधान....
एकच शेवटची इच्छा आहे
सांगशील ? माझ्या डोळ्यांसाठी कुठले भाव निवडले आहेस?
ह्या ओठात कुठल्या कथेला टाके घालणार आहेस?

Monday, April 11, 2011

वावर

असे पुरुष,
पहिल्यांदा मेहेंदीने सजलेले हात आणतात तेव्हा
बराच काळ ठेवतात त्यांना सजवलेल्या मखरातून
असूयेने बघणाऱ्या नजरांचा काउंटर जितका जास्त
तितकी असते त्यांची अभिमानाची लिंग-कॉलर ताठ

असे पुरुष,
शिकवलेले असते त्यांना लहानपणापासून
पाहिलेले असते त्यांनी,
काका, मामा आणि बापाला सफाईदारपणे
आणलेले हात वापरताना...
साला ते चुकत नाहीत
शेंडीला गाठ मारून घोकतात सगळ्या ऋचा
घेतात कानमंत्र बापच्या मांडीवर

असे पुरुष,
निवडतात हात परंपरेने घडवलेले
लॉस्ट अत्मभान मेथड; परफेक्टेड ओव्हर सेंचुरीज
चकाचक घर, रुचकर स्वैपाक, मैथुनी शृंगार
साला सगळे चोख
रगड रगड रगडतात आणलेले हात
आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर
उभे करतात दारामागच्या कोपऱ्यात
केरसुणीसारखे.

असे पुरुष,
कोरतात कोपर्‍या पर्यंतचे हात
मेल्यानंतर सतीच्या दगडावर
कधी एक, कधी दोन, कधी अधिक
जेव्हढे जास्त हात तेव्हढे जास्त कर्तबगार

काल विंचरताना आत्म्यातील अडगळ
जाणवला अशा पुरुषाचा वावर...
माझ्या व्यक्त होण्यात दिसतात अचानक कधी
त्याच्या अभद्र सावल्या...

मी कँसर रोखण्याचे उपाय वाचू लागतो...

Saturday, January 29, 2011

प्रथमेषा

आकाराची रेघ काचते अव्यक्त आतली बोली
पाय उचलता दिशा जन्मते ही कसली रे खेळी?
ज्या ढोलावर थाप घालता घुमे निवळ शांतता...
त्या जातीचा शब्द रचण्या, तुझी याचतो तुर्यावस्था

निळा पक्षी

निळा पक्षी
मिटून बसला
पंख उराशी
झेप झोपली,
निळाईचे ओघळ उरले
चिकट थारोळ्यात ...
रुतू बहराचे
थर थरावर
उजेडातला अंधार
निळा पक्षी
जखम भोगतो
पाते सुखाचे जाड
शीळ सुजली
स्वप्ने सुजली
त्याचा सुजला साक्षात्कार

फिनिक्स

स्वप्न घेऊन आले पंख
डोळ्यात जखमेला पुन्हा निळे पान्हे
आभाळरोगाचा एखादा रोगी
कण्हतो वादळ

विराम दिला स्वतःनंतर
आता मालकीचे काही नाही
वाटा आल्या वाटा गेल्या
भेगेचा झणाणा

जळात शिरला नग्नपणे
लाटांवर आभाळ हालत राहिले ...
खोल खोल गर्भात कुणाच्या
त्याच्या परतीचे रस्ते
गुंता नुसता!

जरा सांगाल का?

दुःखांतील सृजनशील नागडेपणानंतर
सुखात गुंडाळलेली अनुभवशून्यता
भोगून पांगळे झालेल्यांनो
कुठल्या कुबड्या वापरता
जरा सांगाल का?
समाधी शिकवणारा कुणी
भेटला नाही ह्याची खंत नाही
समाधी म्हणून प्रत्येकाची
आत्महत्या पूजनीयही होत नाही
तुम्ही चालता आहात
तिरस्काराने थुंकावे तशी
आता माझीही पाउले त्याच रस्त्यावर
गुळगुळीतपणाची थोबाडीत खाऊन
कोडगे झालेले सारे शब्द कुठे डागू?
एखादा बामियान बुद्ध ठिकरला म्हणजे?
आत्मदिमाखाचे सांडपाणी संपलेल्यांनो
तुमचे हौद कुणापुढे धरता
जरा सांगाल का?

रुद्रायन

असा शब्द सहज भेटायला आल्यावर काय करायचे?
जाणुन घ्याय्चे त्याचे अंतरंग
त्याचे भाजलेपण
त्याचे अस्तित्व?

असे अर्थलागण न झालेले शब्द
जमवतोय मी... उल्कांचे अवशेष
पण वापरतोय परिचित हत्यार
यमक गमक मात्रा व्रुत्ते अलंकार
त्यांच्या जपणुकिसाठी

सतत काय मिळाले हे शोधणारे लोक
कित्येकदा येतात भावार्थ हुंगत
आणि नाकारून जातात ...
खुप चिरंतन असे काही
माझा नाइलाज आहे!

रुद्रायन हे निराकार आहे!
अशा रचनेचा अर्थ काय लावाल
बापड्यांनो?

माळ

सुन्न कोरडा माळरान वारा रणरण ऊन
अशा चित्रावर मी स्वतःला पहातो
ओला ब्रश कॅन्व्हासवर दाबावा तसा
सावल्या ओघळत रहातात विलक्षण वेगाने

पावला पावलागणीत हरवत जातो
उन्हात खोल स्वतःला खुपसत जातो
आतले दुखः गहीरे समुद्र
तहानलेल्या अगस्तिय झळा

रखरखित कोरडेपणाच्या धारधार ओल्या बाजू
मनातला ओला पाउस
मनातल्या तापलेल्या काचेवर
प्रत्येक थेंब .....

ब्रश पुन्हा देहात बुडवताना
जाणवतो भेगाळलेला रंग
टणक कोरडा पोपडे झलेला
आत बाहेर माळरान वारा रणरण उन
चित्र संपत नाही
चित्र अंधूक होत नाही
ह्या अखंड कोरडेपणात हे विचित्रसे
सावलीपण ते मात्र ओघळणॅ सोडत नाही.....

विस्फोटानंतर पुन्हा

संपताना माझ्या ज्योतीतले तेज
प्रखर अंधाराचे हे विश्व,
माझे असहाय डोळे,
ह्या खोल घुसणाऱ्या कट्यारी
माझा लाडावलेला जीवात्मा
त्याच्या गलेलठ्ठ सवयींसकट एकाकी

संपूनही संपले नाही(च) गाणे
वणवणताना अतर्क्य दिशांना रस्तेच रस्ते फुटत गेले
दोनपावले भोगताना उराचे दफ़्तर ओझे झाले?
जिव्हाळ्याचे टाके तटतटतात
कधी रंगठेच पाकळ्याचे फूल झालो
कोमेजण्यास समर्थ झालो?

झांज माझी,
टाळ माझी,
देवळात तुटलेल्या असंख्य देहासतारी
ही सारी निर्माल्ये ती ही माझी?
माझ्यातून वगळताना मला
ही उरतात काही अक्षरे
कुठल्या नदीत विसर्जित करशील?

नक्षत्राची ही झडप सोसण्याचे बळ आता उरलेले नाही
बळ नाही म्हणून झडप सुटत नाही
हुंकार विखरू नयेत म्हणून घातलेत ओठाना टाके
आणी शपथ घालताना किती सहज लावलेस
प्रार्थनेचे धारदार पाते माझ्या गळ्याला
माझी किंकाळी अजूनही अनाथ आहे...

या देहदुतानो
तुमच्या स्वागतासाठी मी सज्ज आहे
माझ्या देहावरील वेदनांचा गजमत्त ऋतू
तुमच्या चोचींचे मागतो आहे घाव
एका तत्त्वज्ञानाचे चुळबुळतायत पाय...

माझ्या आयामांचे विश्वदर्शन
भोवळीस माझ्या स्थिरता देत आहेत.
जळणे, मरणे, मैथुन
एकसाथ एकातेक फिरत आहेत.
ऐलोमा पैलोमा गणेश देवा
तुझा खेळ मांडला तीशीच्यादारी...
झिम पोरी झिम कपाळाचा झिम
झिम गेला फुटून...
(पुरुषाने असे मुळुमुळु रडु नये)
हे धगधगणारे आत्नगर्भ
त्याच्या खालचे वेदनेचे अथांग तळे
एक सत्यः उर्जेच्या गर्भात पाणी आणी पाण्याच्या गर्भात ऊर्जा
जगावे कसे?

संवाद विसंवाद माझ्या यातनांचे महानगर
कवडीमोलाने विकले जाते स्मितहास्य
हसणाराही ओला आणि रडणाराही ओला
हीच ह्या नगरातील डोळ्यांची आहे बाधा

अगम्य तसविरींची एक मैफिल जपताना
ह्या जीवनावर फराट्यासारखा ओतलेला मी
काही कुतूहलाने पाहतात, काही पुसू पाहतात
चांदण्या एकमेकीला म्हणे पाण्यात पाहतात?

ह्या एकात्म ठिकाणी
कसले सुख नाही
ह्याचे दु:ख करावे असे वाटतही नाही
दिवा लावताना हात थरथरतो
फुंकर घालताना ओठ
आत्म्याच्या विस्फोटानंतर
उरलेला मी,
(हे कसे शक्य आहे?)
पुन्हा रुजण्यासाठी (लपण्यासाठी ?) माती शोधू लागतो...

देवा

मना दाटते सुख, देव पुन्हा घरा आले
काळोखाच्या भय-स्वप्नी तांबडे आभाळ झाले

वाट चुकलेला कोणी, शोधतो काय जाणे?
उरले न त्याचे काही, काय देणे काय घेणे?

कवटाळ घट्ट घट्ट गुदमरे श्वास येथे
भेट तुझी होता देवा, मोकळे भान झाले...

दर्पणात बघतो प्रतिमा देवपणा लाभलेली
तुझ्या-माझ्या मधे कशी द्वैत-काच आडवी उभी?

श्वास पडले कमी

डोहात चांदणे,चांदण्यात मी
वेचता वेचता श्वास पडले कमी

रे भोगतो जरी स्वप्न शिक्षेपरी
पापण्या जोडतो रोज स्तवनात मी

जा घाल रे सुखा मला तू शिव्या
साथ वेदनेचा ना सोडणार मी

पंख दुबळे जरी सूर्य-झेप मनी
स्वप्न घाण्यास इथल्या ना जुंपणार मी

दिसता वेगळे रूप ह्या दर्पणी
सोड हा देह!वाचली नोटीस मी

अंग भोगमग्न हे जामे मलमली
नग्न आत्म्याचा दोष दिला कृष्णास मी

मिथक

१.

अजयने खिडकीचे दार उघडले. समोरच्या पदपथावर शेजारच्या सोनावण्यांची मुग्धा शाळेच्या बसची वाट पाहत उभी होती. पाठीवर दप्तर, हातात पाण्याची बाटली, पायात लाल बूट, चेहर्‍यावर बस कधी येते याची आतुरता. अजय निर्विकारपणे हे पाहत होता. सोनावणे आजी, म्हणजे मुग्धाची आजी, मुग्धाला हे करू नको, ते करू नको, असे वाग, तसे वागू नको हे सांगण्यात गुंग होत्या. अजयने हातातल्या चहाचा घोट घेतला. सकाळच्या आठाचे ठोके पडायला सुरुवात झाली. एक दीर्घ श्वास घेत त्याने सुस्कारा सोडला. डोळे मिटून अवघडलेली मान उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे फिरवली. पुन्हा एक दीर्घ श्वास घेत तो वळला. पलंगावर त्याचा इस्त्री केलेला ड्रेस पडला होता. चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवत त्याने आवरायला सुरूवात केली. शर्ट चढवला, मोजे घातले, यांत्रिकपणे पँट चढवली. मानेभोवती टाय अडकवून तो आरशात पाहत उभा राहिला. टाय बांधता बांधता नेहमीच्या सवयीने त्याने स्नेहाला हाक मारली, "स्नेहा, माझं वॉलेट कुठे आहे?" आणि दुसर्‍या क्षणी त्याच्या काळजाचा ठोका चुकला. डोळे पाण्याने भरून आले. हाताला घाम फुटला. तसाच आवेगाने मागे होत तो पलंगावर दोन हात बाजूला ठेवून मान खाली घालून बसला. येणार्‍या उमाळ्याला आवरायचे सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते. ओंजळीत चेहरा लपवत तो तसाच पलंगावर लवंडला. मुसमुसत रडत राहिला.

"अजय, तू शहाण्यासारखा ऐकणार असशील तरच मी पुढची गोष्ट सांगेन. नाहीतर जा पाहू कामाला", सोनावणे आजी अजयला लटके रागे भरत होत्या. "सांग ना आजी पुढे काय झालं", अजय आपले लाल बूट पुढे मागे हलवत आजीला विचारत होता. अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन वाजत होता. अ‍ॅम्ब्युलन्स अजयसमोर येऊन उभी राहिली. अजयने आजीचा हात सोडला व धावतच तो अ‍ॅम्ब्युलन्समध्ये चढला. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये स्नेहा आडवी पडली होती. अजय तिच्या शेजारी जाऊन बसला. "तुला नीट ठेवायला काय होतं रे तुझं वॉलेट? हे घे", स्नेहाने पुढे केलेले वॉलेट अजयने हातात घेतले. अजयच्या हातात लाल भडक, रक्त गाळणारे हृदय ठोके घालत होते.

अजय दचकून जागा झाला आणि उठून बसला. त्याचे हृदय भयंकर वेगाने धडधडत होते. अंगाला दरदरून घाम फुटला होता. घर शांत होते. बाहेर रहदारीचा आवाज येत होता. अजय बेसिनपाशी गेला. त्याने तोंडावर पाणी मारले. परत येऊन पलंगावरचा फोन उचलला आणि ऑफिसचा नंबर फिरवला."सुरेश, धिस इज अजय हिअर. येस. आय वॉज. बट आय नीड सम मोअर टाइम. आय अ‍ॅम एक्स्टेन्डिंग माय लीव्ह. येस, आय विल फाइल इट. प्लीज अप्रूव्ह. नो, आय डोन्ट नो. येस, अ मंथ, मे बी मोअर. थँक्स. शुअर."
फोन बाजूला फेकत तो पुन्हा खिडकीसमोर येऊन उभा राहिला.

"आपल्या या बोधी पर्वतात? आजी, तू कशावरपण विश्वास ठेवतेस. अगं, मिथ आहे ते."
गारी, अजयची आजी, वाती वळतावळता थांबली व अजयकडे पाहत तिने विचारले, "मिथ म्हणजे?"
"मिथ म्हणजे... आई, 'मिथ'ला मराठीत शब्द काय, गं?" अजयने आईला विचारले.
"दंतकथा. अजय, तिला छळू नकोस उगाच."
"कळलं?" गारी आजीकडे पाहत अजय चेष्टेच्या सुरात म्हणाला.
"डोंबलाची दंतकथा. अरे, खरंच, अशी माची आहे, जिथे एक झोपडं आहे आणि त्यात द्विज नावाचा ऋषी गेली अनेक तपं राहतोय. त्याचेच तर शिष्य होते आपले गोविंदमहाराज. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत बघ त्या ऋषीकडे. गोविंदमहाराजांना त्यानेच दीक्षा दिली. गोविंदाय नम: गोविंदाय नम:", आजीने भिंतीवरच्या गोविंदमहाराजांच्या फोटोला मनापासून हात जोडले. अजय तावातावाने पुढे काही बोलणार इतक्यात आईने त्याला डोळ्यांनी दाबले. अजय गप्प झाला.

खिडकीच्या समोर अजय गप्प उभा होता. गारीआजीच्या वाड्यातला तो झोपाळा, ते सारवलेले अंगण, तिच्या सुरकुतलेल्या हाताचा तो मऊ स्पर्श, तिचे ते "गोविंदाय नम:" म्हणणे... अजयला भडभडून आले. आजी गेली तेव्हा अजयला जायला जमले नव्हते. कुठल्यातरी असाइन्मेन्टवर तो युरोपमध्ये होता. क्लायंट महत्त्वाचा होता. त्याच्याशिवाय डील होणार नव्हते. थांबणे भाग होते. घरी सगळ्यांनी समजून घेतले होते. अजयची समजूत घातली होती. आजी कोमामध्ये आहे, तू आलास तरी काय उपयोग? सगळं तार्किकदृष्ट्या योग्य पण... "सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत बघ त्यांच्याकडे", आजीचा आवाज अजयच्या कानाजवळ कुजबुजला. दचकून अजयने आजूबाजूला पाहिले. घर शांत होते. बाहेरून रहदारीचा आवाज येत होता.

समोरच्या टीपॉयवर स्नेहाचे मृत्युपत्र पडले होते.
"अजय या पैशांचं काय करायचं? सोन्यासारखी पोटची पोर गेली. या पैशांनी परत येणार आहे?" स्नेहाच्या वडिलांची व्याकुळता, तिच्या आईचे कोलमडून पडणे अजयला आठवले. आधार देण्यासाठी आतआतपर्यंत त्याला काही सापडले नव्हते. आवंढा गिळून त्याने पुढची इच्छा कशीबशी वाचली होती. स्नेहाने एक बरीच मोठी रक्कम बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीला देणगी म्हणून दिली होती. स्नेहाला पक्ष्यांचे वेड होते. स्नेहाला सगळ्या निसर्गाचेच वेड होते.

"अजय, बघ पटकन. हा इंडियन ग्रे हॉर्नबिल", आपली बायनॉक्युलर अजयकडे देत स्नेहा उत्साहाने म्हणाली. अजय कुणाशीतरी फोनवर बोलत होता. कसनुसा विनवणी करणारा चेहरा करत त्याने फोनच्या तोंडावर हात ठेवत ओठांनीच 'बॉस' असे म्हटले आणि पुन्हा बोलण्यात मग्न झाला. परत घरी येताना स्नेहा एक शब्दही अजयशी बोलली नव्हती.

"ओ, कमॉन स्नेहा. कशाकरता चिडली आहेस इतकी?"
"कशाकरता? राइट, आजचा दिवस दोघांनी एकत्र घालवायचा ठरवले होते. पण तुला कामापुढे काही सुचत नाही."
"अरे! असे काय करतेस. हे प्रोजेक्ट महत्त्वाचं आहे."
"आणि मी नाही? मला काही कामं नाहीत? तुला माझी आणि माझ्या वेळेची काही किंमत नाही, अजय."
"याचा आणि त्याचा काय संबंध. उगाच कुठलीही गोष्ट कुठेही ताणू नकोस. तुला आवडतं म्हणून आपण गेलो होतो."
"मी बळजबरी केली नव्हती. उपकार नाही केलेस माझ्यावर आलास ते. आधी विचारलं होतं तुला. जेव्हा काहीही ठरवायचं असतं दोघांनी करण्यासारखं तेव्हा तुला इच्छा नसते काहीही ठरवायची. मी ठरवलं की तुला इतर उद्योग सुचतात. हे असं अर्धवट मनाने काही करण्यापेक्षा स्पष्ट नाही म्हणालास तर खूप बरं होईल", स्नेहा फणकार्‍याने निघून गेली.

हातातल्या बायनॉक्युलरमध्ये पडलेले प्रतिबिंब न्याहाळत अजय बराच वेळ बसून होता. त्याच्या नकळत त्याने बायनॉक्युलर डोळ्यांना लावली. समोर बॅंडेजमध्ये गुंडाळलेली स्नेहा झोपली होती. नकळत त्याने हात पुढे केला. "प्लीज, इथे जवळ बस", स्नेहाला बोलायला खूप त्रास होत होता.
"एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन, यू सी.." अजयने तिचा हात हातात घेतला.
"आय हॅव नो रिग्रेट्स... आय लव्ह यू", स्नेहा सारा जीव एकवटत म्हणाली. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते. "ग्रे हॉर्नबिलांची नेहमी जोडी दिसते, अजय", स्नेहा पूर्ण कोमात जायच्याआधी बरळताना म्हणाली होती.

अजयने बायनॉक्युलर पुन्हा टेबलावर ठेवली. टेबलावर क्रेडिट कार्ड कंपन्यांची निमंत्रणे, बँकेची पत्रे, घराच्या टॅक्सचे पेपर पडले होते. समोरच्या कपाटात अजयने मिळवलेल्या ट्रॉफ्या होत्या. अजय ताडकन उठला. त्याने बायनॉक्युलर उचलली, बूट घातले, घराच्या बाहेर पडला आणि तिथेच पुतळ्यासारखा उभा राहिला. पाचेक मिनिटांनी मनाशी निश्चय झाल्यासारखा पुन्हा घरात आला. फोन उचलला आणि त्याने घरचा नंबर फिरवला. त्याला कल्पना होती अजून आईबाबा घरी पोचले नसतील. त्याने मेसेज ठेवला, "आई, बाबा, काळजी करू नका. मी एका महिन्यासाठी परगावी जात आहे. मला या एक महिन्यात कॉन्टॅक्ट करणं जमणार नाही. कुठलीही काळजी करू नका".

२.

अजयच्या पायाला चालूनचालून भेगा पडल्या होत्या. अंगावर जागोजागी खरचटले होते. आज पंधरा दिवस झाले होते. अजय या पर्वतरांगांमध्ये एकाकी फिरत होता. बोधी पर्वतातील त्या माचीचा शोध घेत होता. दोन दिवसांपूर्वी चोबेच्या झोपडीवजा हॉटेलात चहा घेताना चोबेच्या मागे लटकवलेल्या चित्राने त्याचे लक्ष वेधून घेतले होते.
"चोबे, हे कसले चित्र आहे?" अजयने विचारले.
चोबे कसनुसे हसला व म्हणाला, "काही नाही साहेब. उगाच पोरखेळ".
अजय त्याच्याकडे रोखून बघत राहिला. तसा त्यालाही कंठ फुटला. "साहेब, या भागात अशी दंतकथा आहे की ही झोपडी दक्षिणेकडच्या अतिशय दुर्गम अशा रांगेत एका माचीच्या टोकाला आहे. म्हणतात तिथे कुणी साधू अनेक वर्षे तप करत बसलाय."
"चोबे, तुमचा विश्वास दिसतो,या कथेवर."
"तसं नाही साहेब, पण हे चित्र माझ्या आज्याने काढलंय. त्याने म्हणे प्रत्यक्ष त्याच्या डोळ्यांनी पाहिली ही झोपडी. आज्याचे आशीष म्हणून लावलं आहे हे चित्र. इतकंच."
"मला माहीत आहे तिथे कसं जायचं", या दोघांचे बोलणे ऐकत बसलेल्या एका इसमाने मध्येच म्हटले.
"भोसडीच्या, गप्प राहा", चोबे त्या इसमावर खेकसला. "साहेब, वाईट शब्दाची माफी करा. पण हे आहे गांजाड. दिवसभर पडलेला असतोय इथे. दुसरा उद्योग नाही. लोकांकडून पैसे घेतो, गांजा मारून पडून राहतो. ऐकू नका याचं काही".
अजयने चोबेचे पैसे चुकते केले आणि तो बाहेर पडला. त्याच्या मागून तो गांजाडा इसमही.

"मला माहीत आहे तिथे कसे जायचे ते."
अजयने दुर्लक्ष केले. त्यानंतरही बराच वेळ तो इसम अजयच्या मागे मागे येत राहिला. अजयला काय वाटले कोण जाणे, अचानक थांबून म्हणाला, "सांग कसे जायचे तिथे?"
"काय देणार?"
"किती पैसे हवेत?"
"पैसे सगळे. त्याचबरोबर तुमचे जॅकेट, शर्ट आणि हे तुमचे बूटसुद्धा."
"वेड लागलंय का?"
तो इसम नुसताच हसला. दहाएक मिनिटांनंतर अजय थांबला. बराच वेळ तो झाडावरच्या कुठल्यातरी पक्ष्याकडे बघत राहिला आणि अचानक मागे वळून त्या इसमाला म्हणाला, "ठीक आहे. सांग".

अजय दगडाच्या आडोशाने झोपला होता. हे शरीर नवीन होते. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक श्वास वेगळा होता; मोकळा होता. स्नेहा गेली हे आयुष्याला पडलेले भगदाड कसे बुजवावे हे समजत नव्हते. प्रत्येक पानाचे, प्रत्येक पक्ष्याचे बारकाईने निरीक्षण करण्याचा चाळा लागला होता. नकळत त्याचे कान बारीक आवाज टिपत होते. रात्रीच्या काळोखात सजीव, निर्जीव या सगळ्यांमध्येच काहीकाही बदलत जाते आणि दुसर्‍या दिवशी उजाडलेल्या प्रकाशात लखलखणारे जग सर्वस्वी नवे, निराळे असते. अजय उठला. दूरवर पसरलेल्या पर्वतरांगांकडे त्याने पाहिले. थंडगार वार्‍याच्या जाणिवेने त्याने त्या इसमाने दिलेली फाटकी शाल गुंडाळून घेतली आणि तो चालू लागला.

आज पाच दिवसांनंतर तो माचीसमोर उभा होता. दूर माचीच्या टोकाला एक झोपडे होते. पण माचीची रुंदी अतिशय कमी होती. त्यावरून चालणे शक्यच नव्हते. इतक्या उंचीवर वार्‍याचा वेग प्रचंड होता. दोन्ही बाजूंना हजारो फूट खोल दर्‍या होत्या. अजयचे सगळे अवसान गळले. मनाचे सारे बांध फोडत वैफल्य दाटून आले आणि दुःखातिशयाने तो तिथेच मटकन बसला.


"सॉरी, वुई ट्राइड अवर बेस्ट", डॉक्टरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"व्हॉट डू यू मीन, यू ट्राइड युवर बेस्ट? कम ऑन, डॉक्, डू समथिंग. काहीतरी असेल, कुणीतरी असेल?" डॉक्टरांनी मान हालवली. अजयच्या डोळ्यांत साठलेल्या पाण्यात त्याच्या मुठीत असणारे आयुष्य विरघळून गेले.
"अजय, आत जा", बाबांनी त्याच्या खांद्यावर थोपटले.
"नाही जमणार मला, बाबा. काय सांगू मी तिला. कसा फेस करू?"
"राजा, मन घट्ट कर. दैवापुढे इलाज नसतो. सगळं आपल्या हातात नसतं रे!" आईने तोंडाला पदर लावत हुंदका दाबला.

अजय ताडकन उठला. दूरवर दिसणार्‍या झोपडीकडे जळजळीत कटाक्ष टाकत त्या माचीवर त्याने स्वतःला झोकून दिले आणि सरपटत सरपटत तो त्या झोपडीकडे सरकू लागला. दोन दिवस लागले त्याला ती माची पार करायला. अंगावरचे उरलेले कपडे फाटून गेले होते. जणू काही पहिल्या मीलनासाठी कुठलेही कृत्रिम पेहराव न घालता भेटणे अपेक्षित होते. सारे अंग जखमांनी भरले होते. या दोन दिवसांत तो एखाद्या जनावरासारखाच राहिला होता. माणसाच्या जनावर या रूपाची झालेली ही ओळख आयुष्यभर बाळगलेल्या स्वतःविषयीच्या त्याच्या कल्पनांना उद्ध्वस्त करून गेली होती. झोपडी ज्या जागेवर होती ती जागा विस्तीर्ण होती. तिथे पोचताच शक्तिपाताने अजयने जमिनीवर अंग झोकून दिले आणि गाढ झोपी गेला. जाग आली तीच मुळी पावसाच्या हलक्या सरीने. समोरच्या दगडी खळग्यात साचलेले पाणी पिऊन त्याने तहान भागवली आणि तो झोपडीच्या समोर उभा राहिला.

"तू तिला विचारणार आहेस? आज?" राहुलचा, अजयच्या मित्राचा, विश्वास बसत नव्हता.
"हो."
"मला नाही वाटत ती तुला हो म्हणेल."
"का?"
"तुझी अ‍ॅम्बिशन कॉर्पोरेट लॅडर चढायची. तिला कॉर्पोरेट वर्ल्डची किती अ‍ॅलर्जी आहे माहीत आहे ना तुला?"
"सो? ऑपोझिट्स अ‍ट्रॅक्ट हे ऐकलं आहेस ना रावल्या? आणि लग्न करशील का? हे नाही विचारणार तिला गाढवा! जस्ट अ डेट. माय फिलॉसॉफी या बाबतीत 'वाहने सावकाश हाका' अशीच आहे बे."

तो सार्‍या शक्यतांचा क्षण पुन्हा अजयच्या मनात तरळून गेला. आज तो गारीआजीच्या गोष्टीतील झोपडीसमोर उभा होता. काय असेल आत? प्रचंड उत्सुकतेने त्याने झोपडीत प्रवेश केला आणि तितक्याच तोलमोलाने निराशेने त्याचे स्वागत केले. आत काही नव्हते. प्रचंड संतापाने त्याने झोपडीच्या भिंतीवर लाथा घालायला सुरवात केली. तोंडाने अखंड शिव्या चालू होत्या. भावनेचा आवेग ओसरल्यावर तो बाहेर आला आणि आजूबाजूच्या शिखरांकडे पाहत जोरात ओरडला, "यू फूल". काही सेकंदांनी ती सारी शिखरे पुन्हा त्याच्यावर ओरडली, "यू फूल". अजय मोठ्यांदा हसायला लागला. त्याचे सारे त्राण संपले होते. त्याच्या हातात पुन्हा एकदा काहीच लागले नव्हते. अजयला भोवळ आली आणि तो त्या झोपडीसमोरच कोसळला.

जाग आली तेव्हा उन्हे चढली होती. बहुतेक सोसाट्याचे वादळ येऊन गेले असावे. ती झोपडी दूर फरफटून गेली होती आणि माचीच्या टोकाला अगदी पडण्याच्या बेताने उभी होती. झोपडी बांधायला वापरलेला एक बारीक दोर दगडांच्या सांदीत अडकला होता. केवळ त्याच्या आधाराने ती अजून टिकून होती नाहीतर ती कधीच खाली कोसळली असती. अजयने मागे पाहिले. इथे थांबण्यात काही अर्थ नव्हता. पण मग त्याने विचार केला, या मिथकाचा शेवट बघून जाणेच कदाचित योग्य ठरेल. "आय नीड क्लोजर", असे पुटपुटत तिथेच एका दगडावर तो वाट बघत बसून राहिला.

३.

मिनिटांचे तास झाले, तासांचे दिवस. ती झोपडी अजूनही कोसळली नव्हती. त्या एका दोर्‍याच्या बळावर ती उभी होती. अजयला नवल वाटले. नकळत त्याने बघ्याची भूमिका घेतली. जवळच उगवलेली करवंदं आणि पानावर साठणारे दंव, अधूनमधून पडणारी सर यांनी पोटापाण्याचा प्रश्न तसा सोडवला होता. वाट बघण्यात महिना उलटून गेला होता. घरचे काळजी करत असतील, एक विचार येऊन गेला. एकापाठी दुसरा, दुसर्‍यापाठी तिसरा. तो त्रयस्थपणे विचारांकडे पाहत होता. ऋतू बदलत होते. जोरदार वार्‍यांचा ऋतू संपला. पावसाचा ऋतू आला आणि गेला. पण तो इवलासा दोर हार मानायला तयार नव्हता. झोपडी अजूनही उभीच होती. पावसाच्या ऋतूनंतर आला बहराचा ऋतू. झोपडी अजूनही तग धरून होती. आज सहाएक महिने होत आले होते.

अचानक एक निळा पक्षी घुमटदार शीळ घालत त्या झोपडीवर उतरला. अजयकडे तो बराचवेळ बघत बसला होता. त्यानंतरच्या दिवसांत त्या पक्ष्याने त्या झोपडीच्या छपरावर एक घरटे बांधले. काही दिवसांनी त्यात दोन अंडी घातली. अजय हे सगळे पाहात होता. याचा काय अर्थ लावावा हेच त्याला समजत नव्हते. काही दिवसांनी त्या अंड्यांतून दोन इवले राखाडी रंगाचे जीव बाहेर आले आणि त्यांच्या किलबिलाटाने ती माची भरून गेली. कुठल्यातरी अनामिक आनंदाची जाणीव अजयला होत होती. तो पक्षी रात्रंदिवस त्या पिलांसाठी चारा आणत होता. अजयच्या लक्षात आले दोन पिलांत एक पिलू आडदांडपणाने सगळा चारा घेत होते व भराभर वाढत होते तर दुसरे कमजोर होत चालले होते. अचानक अजयच्या काळजात धस्स झाले. "यातले एकच जगणार", तो स्वतःशीच पुटपुटला. काहीतरी करायला हवे. दुसर्‍या कमकुवत पिलाला वाचवायला हवे. त्याची उलाघाल चालली होती. एके दिवशी या अस्वस्थतेत तो झोपडीच्या दिशेने निघाला आणि "सगळं आपल्या हातात नसतं रे!" हे आईचे शब्द ऐकून जागीच थबकला. स्नेहा गेली, गारी गेली, आता हे पिलू जाणार. एक दीर्घ श्वास घेत तो मागे फिरला आणि त्या अटळ क्षणाची वाट पाहत बसून राहिला. एका दुपारी त्या आडदांड पिलाने धक्का दिल्यानंतर एक हृदय पिळवटणारी शीळ घालत ते कमजोर पिलू खालच्या खोल दरीत फेकले गेले. अजयने डोळे मिटले. त्या कोसळणार्‍या पिलाची प्रत्येक भावना त्याला समजत होती. काही वेळाने त्याचे सारे शरीर खालच्या दगडावर आदळल्याचा भास त्याला झाला. सारे संपले. त्याने डोळे उघडले. समोर तो निळा पक्षी त्या उरलेल्या पिलाला चारा भरवत होता. एक पिलू कमी आहे हे त्याच्या गावीसुद्धा नव्हते. डोळ्यांच्या कडेला साचलेले पाणी अजयने पुसले.

बहराचा ऋतू संपत आला होता. येणार्‍या सोसाट्याच्या वार्‍यांच्या ऋतूची चाहूल लागायला लागली होती. अजयला त्या दोराची कंपने समजत होती. हा शेवटचा ऋतू. घरट्यातील पिलू आता चांगलेच मोठे झाले होते. घरट्याबाहेर तासन्‌तास ते बसून राहत असे पण अजूनही ते उडायचा प्रयत्न करत नव्हते. अजयच्या मनाची उलाघाल होत होती. याने उडायला हवे. नाहीतर याचाही शेवट... अजयचे मन धजत नव्हते... आयुष्यावर स्वार होण्याची इतकी सवय अजूनही मोडत नव्हती. हे पिलू उडाले नाही तर तो बघ्याची भूमिका सोडणार हे स्वतःलाच बजावायचा प्रयत्न करत होता. पण आज मन ते ऐकत नव्हते. सोसाट्याचा वारा सुटला होता. कोणत्याही क्षणी तो दोर तुटणार. अजयच्या काळजात धस्स झाले आणि दोर तुटला. त्या झोपडीच्या कोसळण्याबरोबर ते पक्ष्याचे पिलूदेखील कोसळत होते. त्या पिलाची आई वर घिरट्या घालत शीळ घालत होती.

अजयने डोळे मिटले. अजयच्या आयुष्याला बांधून ठेवणारा स्नेहा नावाचा दोर तुटला. अजय आयुष्यावर बेफिकीरपणे बसला होता. सगळे संपले होते आणि अचानक कुठूनतरी अजयच्या मनाला पंख फुटले. एका अनामिक शांततेने त्याला बुडवून टाकले आणि त्याने आपले दोन्ही हात फैलावले. आपल्या अंगाखाली दूर दूर जाणार्‍या झोपडीकडे एकदा पाहिले आणि त्याला तरंगल्याची जाणीव झाली. समोर मोकळे आकाश होते आणि नकळत त्याच्या चोचीमधून एक घुमटदार शीळ बाहेर पडली. अजयच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. ते निळे पिलू आपल्या पहिल्या उड्डाणात आसमंत काबीज करायला निघाले होते.

अजय अत्यानंदाने त्याच्याकडे पाहत ओरडला, "हे ऋषी द्विजा, तुला माझा प्रणाम!"
काही सेकंदांनी एकापाठोपाठ एक शिखरांतून उत्तर आले, "हे ऋषी द्विजा, तुला माझा प्रणाम!"
अजय स्तंभित होऊन ऐकत होता. साक्षात्काराचा क्षण असेल तर तो असाच, याची एक वेगळीच जाणीव त्याच्या मनात होत होती. स्नेहाचे जाणे एक मिथक बनून पुन्हा जन्माला येत होते.

विचारपूस

विचारपूस करावी असे वाटत असेल तर माझी कहीच हरकत नाही
फक्त शब्दा शब्दामधील अगणित अंतर
पार करण्याइतकी ताकत माझ्यातरी नाही
असे म्हणतात ही अगणित अंतरे जोडणारी
व्यथेची भुयारे क्शणार्धात घेउन जातात
एका शब्दवेदने पासून दुस्र्या पर्यंत
आणि तुमच्या वेदनेची कोणतीही दंतकथासुधा मला माहीत नाही

Wednesday, January 26, 2011

तुझ्यासारखी माणसे

तुझ्यासारखी माणसे
त्यांच्या पंखावर निजत आकाश
बघत स्वप्न, घेत गुडघे पोटाशी

माझ्यासारखी माणसे
हात पसरतात पंखा सारखे
मांज्याला चोळतात काचा
जिंकू पाहतात आकाशाचा तुकडा

तुझ्या सारखी माणसे
फाटक्या दु:खाला
घालतात टाके, मायेने, उपजत तीक्ष्णतेने
उध्वस्थ मनात
वसवतात मैफिली आपल्या हिरव्या हाताने

माझ्यासारखी माणसे
आपुलकीच्या हातांची
कापतात बोटे नव्या कागदासारखी
बांधतात अभेद्य किल्ले
माहिती असतात प्रत्येकाच्या गळ्याची मापे

तुझ्यासारखी माणसे भेटल्यावर
माझ्यासारखी माणसे
पळत सुटतात जीवाच्या आकांताने
क्लॉस्ट्रोफोबिक होते तुझ्या आकाशात
मायेच्या तिक्ष्णतेत दिसते औषधी इंजेक्शन
आणि तुझ्या गळ्याचे माप घेण्याइतके बळ नसते
माझ्यासारख्या माणसांच्या मनगटात

Sunday, January 23, 2011

सण

वेग झाला देह
रेघ रेंगाळे नभात
पंख भोग ऊतु आले
आला लांबचा प्रवास

फूल उमले फांदीशी
जिची व्याख्या लोंबकळे
निळी झेप जाणीवेची
भय टाचेत दुबळे...

वेग झाला देह
ढग मैलाचा दगड
शुभ्र झाले दुःख माझे
हिम वर्षावाचा सण

Friday, February 23, 2007 - 1:30 am

बंद कवाडे

बंद कवाडे
काही मागण्यासाठी असतात?
लपवतात ती
आतला कोवळा जखम...
त्याचा पाझरणारा उजेड...
दादागिरी फक्त काळोख करत नाही
उजेडाची जरब भोगणाऱ्या
असंख्य डोळ्यांना
बर्फाची धाव घेताना
पाहिल्यावर पापण्या मिटतात
तसे असते कवाडांचे
अंधार विरघळवून टाकतो
रेघा भासांचे अस्तित्व...
आरशातील परावर्तित प्रतिमा...
ज्ञानाच्या गोधडीवरील
आत्मघोशाचे डाग...
कुठलीही शिवण न उसवता
नागडे करून जातो तो
आतला दुबळेपणा
स्वतःच्या नकळत स्वतः:साठीच
कसा पोलाद होतो
हे अंधारात वितळाल्या खेरीच
कवाडे मिटल्या खेरीच
कसे उमजणार?

Friday, February 23, 2007 - 12:27 am

भेट

संत भेटला मला
ज्याचा गाढा अभ्यास होता
लाळेलाही त्याच्या
अध्यात्माचा गंध होता

कसे असावे असणे?
वाकून विचारता झालो...

छंद असावा आकार असावा
पाहताच तुजला त्यांनी
वाहवा ! उद्गार ओकावा...
ते तुझे डुलणे लयीत असावे
रंग रूपाने तुझ्या
नियमांचे दिव्य वस्त्र ओढावे
वत्सा तू तू नसावे
तू कुणाच्या व्याखेत ओतलेले मेण असावे
हे असे असेच असणे असावे...

संत भेटला मला
असण्याचा अर्थ ज्याचा
माझ्या इतकाच निरर्थक होता
गाळणाऱ्या अध्यात्माला त्याचा
कसल्याशा भुकेचा वास होता

Sunday, February 04, 2007 - 5:14 pm:

दबा

हा रस्ता कुठे जातो?
माझ्या प्रश्न पासून दूर
हा मोहर झाडावरचा
हा बर्फ़ामधला लाल पक्षी
दोन रुळासारखे डोळे माझे
स्वप्न धावते सोडत धूर

हा रस्ता थांबतो जिथे
तिथे इमारत गगनचूंबी
खिडक्या भरून उजेड फेकत
दारा मागे दार लपवून
माझ्यासाठी दबा धरलेली

Friday, January 19, 2007 - 8:07 pm

माडी

तुझा गुरु दशमात आहे
तसा निर्बलीच पण
दशमात गुरु उत्तम असतो
तसे कुंभेचा म्हटल्यावर तो उच्चिचाच
तसे अष्टमेशाचे फारसे दोष त्याला लागत नाहीत...
पण संतती पासून सुख नाही तुला...
त्यातून षष्ठेश शुक्र तिथे...
माड्या चढता चढता पाय मोडल्या सारखेच हे!
गुरु दशमात आहे तुझ्या...
काळजी करू नको
फक्त जमलं तर गुरुजनांचा आदर राख...
त्याचे काय आहे तू मागच्या जन्मी एक वासरू मारले आहेस
(भृगु संहितेच्या पानावर )
तेव्हा एखादी गाय (सोन्याची) दान कर...
आणि येत राहा...
अजून बरेच ग्रह
बर्याच अंशात
बर्याच होर्यात
बर्याच योगात
विपरीत राज्योगात
अर्धा कालसर्पही
जरा सविस्तर बघतो
ये आता आज गर्दी आहे
दक्षिणा बाहेर दे मी स्वतः घेत नाही
काळजी करू नको गुरु दशमात आहे तुझ्या!

Tuesday, December 12, 2006 - 3:23 am

गरज

गंज चढत नाही म्हणून एकदा
हातावरती परीस घासून पाहिले...
पोलाद नसलेल्या आत्मभानात मनगट साक्षात्कारी नाचले...

लुबाडणारे तसे आश्रयास येणारे...
जिव्हांना त्यांच्या नालस्तीचाच लाळ केवळ
निर्लज्ज, गुंता झालेले, हात माझे उकलणे भोगण्यात समाधिस्त होते...

माणसावर ज्यांचे प्रेम होते सर्वांगाला त्यांच्या कत्तलीचा सुगंध होता...
मानेवर माझ्या अशा संताचा मोक्षदायी सुरा हवा होता.

Monday, December 04, 2006 - 7:09 pm

चिमार

'चिमार'
ही गाठ शब्दाला आलेली (अस एक मत)
व्यक्त करण्याकरता तिलाच पुढे धरा
व्याकरणात ती बसत नाही
कुठेतरी बसावा असेही नाही
एखादे चिंब भारले पण
एखादं फळासारखं दुःख
ह्यांच्या तळव्यावर ठेवण्यास उत्सुक आहे
बिया कोया पाने फुटणारी मुळे
झारी धरणारे हात
गंजलेले पण सर्वव्यापी
ह्यांचया कुळातील
कदाचित
पण माहीत नाही!

'चिमार' ही परंपरा आहे
आत्मसात करून
स्वतः रंग होऊन
ओतून घेण्यास आसुसण्याची
कदाचित
पण तेही मला नक्की माहीत नाही

गाणं

अस एक गाणं वेळी अवेळी जाग होत
आणि मग जोजवता जोजवता
चांदण्यांच्या कवेत
अलगद कस सोडून जात?

चांदण्यात हरवण्याच एक बरं असत
ठेच, खड्डा, दगड, सगळंच चंदेरी असत!
वाट फुटेल तिकड स्वप्नांच गाव लागत!

पाणी गोजिरवाणं वगैरे
भुंगे भ्रमर वगैरे
बटा मुजोर वगैरे
शब्दांचंही चांगलंच फावत

अस एक गाणं वेळी अवेळी जाग होत
आणि जोजवता जोजवता
चमचमत्या मुंग्यांत फेकून देत!

Friday, August 11, 2006 - 1:37 am

Saturday, January 22, 2011

ऋतू

डोळ्यात ऋतू पावसाचे
ढगाआड ऊन - हसू ओठांवरचे?

कळेना वळेना पंख निळ्या फुलपाखराचे - जपण्यास दिले का?
पान पान उतरवूनी आलो स्पर्शाकाठी तुझ्या
मेंदी ओले हात वणवा जपतात म्हणतेस का?

एक लाट अर्धी अर्धी कशी वाटून घ्यावी?
ही चोरपावलांची भाषा नकळत उमलून यावी...
स्वर बघ दारापाशी सुया घेऊन आले
हे दोन पावली अंतर एकदम वयात आले!

डोळ्यात म्हणे ऋतू पावसाचे
गहिवरातले चंद्र भेटीत न्हाले!

Thursday, August 10, 2006 - 2:40 am

भोग

आपापल्या हातातील जादू
शोधत फिरत राहतात बोटे
पेटीच्या निर्जीव पट्ट्यांवरून
कुणी फुले माळावीत तसे गाणे
चक्काचूर पाकळ्यांचे सकाळी केलेले हिशोब
माझे देणे फीटत नाही
म्हातारा फुलेवालाही आयुष्याशी गंधार भांडतो आहे
विस्कटणाऱ्या प्रतिबिंबासारखे
पुन्हा पुन्हा जुळायचे,
आणी एखाद्या खोल क्षणी
डोळ्यात बुडताना
तुझ्याच ओठांकडे आधार मागायचे...
निर्जीव पेटीने हात भोगावेत तसे!

Friday, March 10, 2006 - 5:05 pm

Tuesday, January 11, 2011

पठार

हे एक विचित्र पठार आहे
त्यावर आहे वेळ मिळत नसलेल्या वेळी चालवायची एक सायकल,
एन.पी.आर. नावाची कानखीडकी,
एक आयकीयातले बिली बुक शेल्फ,
ट्रायग्लिसराईड वाढलेले विचार,
आणि प्रिस्क्राइब केलेली पुस्तके
त्यांच्या साइड इफेक्टच्या फाईन प्रिंट्स...
ह्या पठारावर कुणीतरी जगते आहे
पण हे रुजणारे मूळ माझे नाही
हाताला डिसन्फेक्टंट चोळून
मी ओर्गॅनिक अन्नापाठी भटकतो आहे...
हे पठार विचित्र आहे
एखादे बाम्डगुळ वाढावे तसे
सर्वत्र फोफावलेले.
इथे सहज फेकलेली हाक
बुमरँग सारखी माझ्याच मागावर...
मी लपण्यासाठी
ब्लॉग लिहितो,
फेसबूक वर कन्नेक्ट होतो,
माझे ११.३० पीएम चे उद्योग ट्वीट करतो
चार दोनदा पेज रिफ्रेश करून
मी शट डाउन करत नाही
मी ह्या पठारावर हायबर्नेट होतो...