पावलांचे मुंगळे निघाले
त्या वारुळातील योगी मंत्रामागून मंत्र उसवत राहील
तर नागवे होणाऱ्या शरीराची कुठली असेल पोळणारी जात?
मांडी घालून म्हणता येतात सहिष्णू शब्दरचना
त्याच वेळी निराकार जनावर वेटोळे (? ) घालून
रचत असते जहरोत्तम द्वंद्वगीत...
सहज मनाच्या गाभाऱ्यातील समईची जखम
रुंदावायला लागली की
एखादी पालखी हमखास येते
भोयांच्या खांद्यावरून अनेक समाप्तीच्या कथा पायउतार होतात
पाठ वळवून, ती धून ऐकण्यासाठी
देवळे मिटून घेतात शयनगृहाचे दरवाजे
असहायपणे हेलकावे घेत राहते बाहेर कडी
एक... दोन... तीन
अस्वस्थ कोपऱ्यातील एखादे पिवळे वय
स्वतःची कुरवाळू लागते..
ती भूक नागडी नसते...
सर्व विझायला लागले की वाटांवर कुलुपे कशी लागतात?
रांगेतले सर्वजण एकाच खिडकीकडे पायांना मिठी घालून सरपटत राहतात...
एक एक अवयव खाटीक वेगळा करतो
वाहणार स्राव आढेवेढे घेत नाही..
पाणलोटात जिवाच्या आकांताने मदत मागणाऱ्या कुणाची एक डॉक्युमेंट्री...
रीळ गुंडाळले जाते...
जाणिवा देखील
ह्या साऱ्यांच्या मागे एक वेडसर दिवा
तटस्थपणे
फडफडत असतो....