पंखपार: कविता
Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Saturday, January 29, 2011

प्रथमेषा

आकाराची रेघ काचते अव्यक्त आतली बोली
पाय उचलता दिशा जन्मते ही कसली रे खेळी?
ज्या ढोलावर थाप घालता घुमे निवळ शांतता...
त्या जातीचा शब्द रचण्या, तुझी याचतो तुर्यावस्था

देवा

मना दाटते सुख, देव पुन्हा घरा आले
काळोखाच्या भय-स्वप्नी तांबडे आभाळ झाले

वाट चुकलेला कोणी, शोधतो काय जाणे?
उरले न त्याचे काही, काय देणे काय घेणे?

कवटाळ घट्ट घट्ट गुदमरे श्वास येथे
भेट तुझी होता देवा, मोकळे भान झाले...

दर्पणात बघतो प्रतिमा देवपणा लाभलेली
तुझ्या-माझ्या मधे कशी द्वैत-काच आडवी उभी?

श्वास पडले कमी

डोहात चांदणे,चांदण्यात मी
वेचता वेचता श्वास पडले कमी

रे भोगतो जरी स्वप्न शिक्षेपरी
पापण्या जोडतो रोज स्तवनात मी

जा घाल रे सुखा मला तू शिव्या
साथ वेदनेचा ना सोडणार मी

पंख दुबळे जरी सूर्य-झेप मनी
स्वप्न घाण्यास इथल्या ना जुंपणार मी

दिसता वेगळे रूप ह्या दर्पणी
सोड हा देह!वाचली नोटीस मी

अंग भोगमग्न हे जामे मलमली
नग्न आत्म्याचा दोष दिला कृष्णास मी

Sunday, January 23, 2011

सण

वेग झाला देह
रेघ रेंगाळे नभात
पंख भोग ऊतु आले
आला लांबचा प्रवास

फूल उमले फांदीशी
जिची व्याख्या लोंबकळे
निळी झेप जाणीवेची
भय टाचेत दुबळे...

वेग झाला देह
ढग मैलाचा दगड
शुभ्र झाले दुःख माझे
हिम वर्षावाचा सण

Friday, February 23, 2007 - 1:30 am

भेट

संत भेटला मला
ज्याचा गाढा अभ्यास होता
लाळेलाही त्याच्या
अध्यात्माचा गंध होता

कसे असावे असणे?
वाकून विचारता झालो...

छंद असावा आकार असावा
पाहताच तुजला त्यांनी
वाहवा ! उद्गार ओकावा...
ते तुझे डुलणे लयीत असावे
रंग रूपाने तुझ्या
नियमांचे दिव्य वस्त्र ओढावे
वत्सा तू तू नसावे
तू कुणाच्या व्याखेत ओतलेले मेण असावे
हे असे असेच असणे असावे...

संत भेटला मला
असण्याचा अर्थ ज्याचा
माझ्या इतकाच निरर्थक होता
गाळणाऱ्या अध्यात्माला त्याचा
कसल्याशा भुकेचा वास होता

Sunday, February 04, 2007 - 5:14 pm:

गाणं

अस एक गाणं वेळी अवेळी जाग होत
आणि मग जोजवता जोजवता
चांदण्यांच्या कवेत
अलगद कस सोडून जात?

चांदण्यात हरवण्याच एक बरं असत
ठेच, खड्डा, दगड, सगळंच चंदेरी असत!
वाट फुटेल तिकड स्वप्नांच गाव लागत!

पाणी गोजिरवाणं वगैरे
भुंगे भ्रमर वगैरे
बटा मुजोर वगैरे
शब्दांचंही चांगलंच फावत

अस एक गाणं वेळी अवेळी जाग होत
आणि जोजवता जोजवता
चमचमत्या मुंग्यांत फेकून देत!

Friday, August 11, 2006 - 1:37 am

Saturday, June 5, 2010

धूळ

तो म्हणला बघ काही शब्द पुंजके
ती म्हणे
अरे हे तर नक्ष्त्र
.... शतकातून एकदाच उगवणारे

तो म्हणे शब्दांच्या निव्वळ सुया
ती म्हणे
वेडा की खुळा
माणसातील दगडाला ह्या
फ़ोडतील मायेचा पान्हा!

तो म्हणे काही सुचत नाही
ती म्हणे
ही कल्पनाही सहज कुणाला सुचत नाही!

तो म्हणे मि चाचपडतोय शब्दावर
ती म्हणे
पेटी नाहि रे राजा (नाहितर)
तुझ्या बोटातील तान, धुंदि चढवेल रागांवर!

तो म्हणे अग दगड आहे मी नुस्ता
ती म्हणे
अरे तुझ्या मुळेच येतात फ़ळाला श्रद्धा!

तो म्हणे मौनातच जातो कसा
ती म्हणे
त्याचाही अर्थ भुरळ घालील मना!

तो म्हणे डोळ्यातच तुझ्या नक्षत्र आहे
ति म्हणे
नक्षत्र वैगेरे कही नाही
असली तर तुझ्याच कवितेची धुळ आहे!

Sunday, March 21, 2010

चंद्र-कळा

चंद्र फुलांचे हार गळा
रात्र सजविशी अंग-कळा || धृ. ||

धुंद धुंद मन, बहर-बंध तन
स्पर्श रेशमी, घुसमटतो घन
छेड काढता, लटक्या रागे
म्हणसी मजला 'कृष्ण-काळा'! || १ ||

देह उमलले, मिठीत रमले
श्वास केतकी, गुंफून पडले
रात्री मधूनी, कळीकाळाच्या
रंगला हा रास खुळा || २ ||

एकतनुता, एकतानता,
द्वैत मिटले, दोघांकरता
आसक्तीच्या मैफीलीतह्या
जीव भोगे ब्रह्म-कळा || ३ ||

Sunday, July 26, 2009

पत्र

शब्दांची जळते काया
मन सैरभैर अनावर
गर्द काळ्या डोही
हलते एकट घागर

घन दाट पसरले वरती
दुख्खाचा पहिला गंध
एका कवडशापाई
मन तुडवत जाते काच

मोगरा जपणारे हात
खुडतात कोवळी देठे
मायेच्या स्पर्षा आधी
मन दाबुन घेते ओठ

शब्दांना गोडी कसली?
जबड्यात विषाचा दात
मन कात टाकण्या आधी
शिकते दंशाचा घाव

शब्दांची जळते काया
मन सैरभैर अनावर
थरथरणार्‍या हाती
पत्राची होते राख....

Thursday, January 1, 2009

प्रदेश

तुझे हात नाग गळ्याभोवताली
सुर-केवड्याचे रान बहरुन आले

देहवाटेवरी मिठीचा चकवा
हरवणे सापडावे नव्याने जिवघेणे

सुखाचा बसे काळजास दंश
शरीरावरी शरीर ठीणगी सोसणारे

विष-वादळानंतर उरे दगडदेह
अन मन पिसापरी तरंगणारे

चांदणे रमावे असा हा प्रदेश
स्पर्षांच्या समेवर निष्वास सांडणारे

Tuesday, November 11, 2008

प्रार्थना

तु विकास तु मार्ग
तु बळ पावलातले
तु दगड वाटेवरचे
तुच रणाणते उन
आतले बाहेरचे...

तु सावलीचा विसावा
ओलावा पाण्याचा
ओठातल्या, डोळयातल्या
तु विश्रांतीची मिठी
तुच स्वप्नांना पडलेली भीती
जखडणारी, जिद्दवणारी...

तु कर्तुत्वाची नशा
तुच पोखरणारी निराशा
कुठला कोश कुठले फुलपाखरू?
तु प्रष्णाचे गर्भ,
अन उत्तरांचा फोलपणा...

नमस्काराचि भावना तु
नास्तिकाची प्रार्थना
जिथे विरोधाभास जन्मतो
तुच निवळ प्रेरणा...

पाऊसवेळा

घर खिडक्यांवर
ओघळते सांज वेळ ओली
मन शब्दसाय व्हावे
अशी पावसाची बोली

माझ्या देहभानाचे उंबरे
पल्याड पावसाचा कडा
हवी उसनिशी झेप
किंवा कडेलोट हवा

ह्या पावसाला खोड
मनी घालतो पसारा
सापडला मला मग
माझा कोंडणारा गळा

ह्या पाउसवेळेला
माझ्या भावनांचे शहर
कातर भयाने ऐके
आद्य-हिरवे गजर...

Sunday, April 15, 2007

काळवेळ

१.
काळ वेळ तुडवून
खुप लोक निघून गेलेत
चपलांचे व्रण कहाण्यांन्वर
अता हळू हळु रुजू लागलेत

२.
पत्ता शोधत येणार्याला
कसे सांगावे?
शेवटचे कलेवर गाडुन
गाव पुन्हा गर्भार आहे
वेशिवरती बुद्ध
डोळे मिटुन हसतो आहे?

३.
डोळे किलबिलत असतात
कोसळणार्या द्रव्यव्रुत्ती
कटोर्यामधली कोवली घरटी
अपरंपार करूणेने धरावी
लागतात घटोत्कची विजे पुढती...

४.
काळ वेळ सोडवत जाते
गुंत्यात हरवलेला प्रहर
दिवा घेऊन साजरा करायचा
रसरसणारा अंधार बहर

Saturday, April 14, 2007

उसासा

हा कुंद पाकळ्यांचा उसासा
अंधार मंत्रावे तसे
पापणी पापणीत मिटले
सखे तुझ्या जे
सुख ओठास भिजवते

कवडशांचे हे चोरटे
स्पर्श उतरले जिथे
अजून तुटते पाखरांची
स्पर्शमाळ देहकांतीवर तिथे

बर्फाचे शुभ्र बोचणाऱ्या
अंतरात कित्येक ज्वाळा
सखे तुझ्या दिशेतून येतो
रेशीम उधळणारा वारा



सुखाच्या जखमा

ह्या माझ्या दुख: कायेवर
अंतरा अंतरावर
सुखाच्या जखमा...
खपली खाली
काय धरून बसल्या आहेत?
क्षणांचे शहार ?
जपणे म्हणजे राखणे असतेच असे नाही
हरेक दारा आडुन
चोरून बघणार्या डोळ्यांनो
तुमच्यतही ओतप्रोत भरली आहेत युद्धे
पक्षी निघून गेलेले झाड
तुम्ही आणि मी
सगळेच घायाळ आहोत...