पंखपार: 2013

Tuesday, January 29, 2013

नख


पुन्हा शोधावी का तिला ?
किती सहज उकरायची गाडलेले कबुलीजबाब
फुल्या शिवलेले डोळे
फुल्या शिवलेले ओठ
कधी हसत कधी रडत
विचारायची नुसत्या खुणांनी
'कशी दिसते ह्या नवीन टाक्यांत?'
लांबसडक बोटे, न्याहाळायची ती
कधी शापा सारखी कधी श्वापदा सारखी
बिलगायची अशी की नक्षत्र भारले आभाळ व्हायचे शरीर
आणि कधी हिंस्रतेने करायची शिकार
धारदार, रासवटतेने झालेला छिन्नविछिन्न देह
शिवत बसायची तासंतास
तिने पाळलेली बेवारशी विरह-गाणी
पाहायचो घुटमळताना तिच्या आसपास...
पुन्हा शोधावी का तिला ?
मला भेटून ती निराश झाली तर?
मन धजत नाही, हे रिकामेपण झाकता येत नाही
तिने दिलेल्या जखमा पुन्हा पुन्हा गोंजारताना
दीनवाणा झालेला मी
कुठल्याशा कर्तबगारीने लावेन का कधी
मागे राहिलेले तिचे तीक्ष्ण नख
माझ्याच हुंदका संपलेल्या गळ्याला?