मी कविता करतो हा आरोप
बिल्कुल करू नका माझ्यावर..
निसर्गाची लाज वाटणारी माणसे
नग्न अक्षरांना झाकतात
दर्जेदार शिवलेल्या कपड्याने...
त्यांना असते
रूजामे घातलेली मैफिल..
विस्फोटानंतर उरलेले रक्तलांच्छित ढीग
रचता येत नाहीत मला
मनिप्लांटसारखे सुशोभित कुंड्यातून..
म्हणून मैफिलीबाहेर मी आंगठे धरून
उभं रहायला तयार आहे...
दिखावू भरलेपण घेउन
हिंदाळत नाही महासागर...
हिंदाळणारा एक थेंबही जर
नसेल तुमच्या शरीरपेल्यात
तर दारावर पावसाला बोलावू नका.
तुम्हाला भिजणे जमणार नाही.
त्याहूनही गडद ते उमजणार नाही...
पुन्हा कविता करतो हा आरोप
कृपा करून करू नका..
तुम्ही नाकारलेत भोगून जाणे
हा माझा गुन्हा नाही..
पुढच्या वेळेस
अंगठे धरणारही नाही
आणि कापणारही नाही.
भले तुम्ही द्रोण बनून आलात तरी....
No comments:
Post a Comment