संपताना माझ्या ज्योतीतले तेज
प्रखर अंधाराचे हे विश्व,
माझे असहाय डोळे,
ह्या खोल घुसणाऱ्या कट्यारी
माझा लाडावलेला जीवात्मा
त्याच्या गलेलठ्ठ सवयींसकट एकाकी
संपूनही संपले नाही(च) गाणे
वणवणताना अतर्क्य दिशांना रस्तेच रस्ते फुटत गेले
दोनपावले भोगताना उराचे दफ़्तर ओझे झाले?
जिव्हाळ्याचे टाके तटतटतात
कधी रंगठेच पाकळ्याचे फूल झालो
कोमेजण्यास समर्थ झालो?
झांज माझी,
टाळ माझी,
देवळात तुटलेल्या असंख्य देहासतारी
ही सारी निर्माल्ये ती ही माझी?
माझ्यातून वगळताना मला
ही उरतात काही अक्षरे
कुठल्या नदीत विसर्जित करशील?
नक्षत्राची ही झडप सोसण्याचे बळ आता उरलेले नाही
बळ नाही म्हणून झडप सुटत नाही
हुंकार विखरू नयेत म्हणून घातलेत ओठाना टाके
आणी शपथ घालताना किती सहज लावलेस
प्रार्थनेचे धारदार पाते माझ्या गळ्याला
माझी किंकाळी अजूनही अनाथ आहे...
या देहदुतानो
तुमच्या स्वागतासाठी मी सज्ज आहे
माझ्या देहावरील वेदनांचा गजमत्त ऋतू
तुमच्या चोचींचे मागतो आहे घाव
एका तत्त्वज्ञानाचे चुळबुळतायत पाय...
माझ्या आयामांचे विश्वदर्शन
भोवळीस माझ्या स्थिरता देत आहेत.
जळणे, मरणे, मैथुन
एकसाथ एकातेक फिरत आहेत.
ऐलोमा पैलोमा गणेश देवा
तुझा खेळ मांडला तीशीच्यादारी...
झिम पोरी झिम कपाळाचा झिम
झिम गेला फुटून...
(पुरुषाने असे मुळुमुळु रडु नये)
हे धगधगणारे आत्नगर्भ
त्याच्या खालचे वेदनेचे अथांग तळे
एक सत्यः उर्जेच्या गर्भात पाणी आणी पाण्याच्या गर्भात ऊर्जा
जगावे कसे?
संवाद विसंवाद माझ्या यातनांचे महानगर
कवडीमोलाने विकले जाते स्मितहास्य
हसणाराही ओला आणि रडणाराही ओला
हीच ह्या नगरातील डोळ्यांची आहे बाधा
अगम्य तसविरींची एक मैफिल जपताना
ह्या जीवनावर फराट्यासारखा ओतलेला मी
काही कुतूहलाने पाहतात, काही पुसू पाहतात
चांदण्या एकमेकीला म्हणे पाण्यात पाहतात?
ह्या एकात्म ठिकाणी
कसले सुख नाही
ह्याचे दु:ख करावे असे वाटतही नाही
दिवा लावताना हात थरथरतो
फुंकर घालताना ओठ
आत्म्याच्या विस्फोटानंतर
उरलेला मी,
(हे कसे शक्य आहे?)
पुन्हा रुजण्यासाठी (लपण्यासाठी ?) माती शोधू लागतो...
No comments:
Post a Comment