१.
अजयने खिडकीचे दार उघडले. समोरच्या पदपथावर शेजारच्या सोनावण्यांची मुग्धा शाळेच्या बसची वाट पाहत उभी होती. पाठीवर दप्तर, हातात पाण्याची बाटली, पायात लाल बूट, चेहर्यावर बस कधी येते याची आतुरता. अजय निर्विकारपणे हे पाहत होता. सोनावणे आजी, म्हणजे मुग्धाची आजी, मुग्धाला हे करू नको, ते करू नको, असे वाग, तसे वागू नको हे सांगण्यात गुंग होत्या. अजयने हातातल्या चहाचा घोट घेतला. सकाळच्या आठाचे ठोके पडायला सुरुवात झाली. एक दीर्घ श्वास घेत त्याने सुस्कारा सोडला. डोळे मिटून अवघडलेली मान उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे फिरवली. पुन्हा एक दीर्घ श्वास घेत तो वळला. पलंगावर त्याचा इस्त्री केलेला ड्रेस पडला होता. चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवत त्याने आवरायला सुरूवात केली. शर्ट चढवला, मोजे घातले, यांत्रिकपणे पँट चढवली. मानेभोवती टाय अडकवून तो आरशात पाहत उभा राहिला. टाय बांधता बांधता नेहमीच्या सवयीने त्याने स्नेहाला हाक मारली, "स्नेहा, माझं वॉलेट कुठे आहे?" आणि दुसर्या क्षणी त्याच्या काळजाचा ठोका चुकला. डोळे पाण्याने भरून आले. हाताला घाम फुटला. तसाच आवेगाने मागे होत तो पलंगावर दोन हात बाजूला ठेवून मान खाली घालून बसला. येणार्या उमाळ्याला आवरायचे सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते. ओंजळीत चेहरा लपवत तो तसाच पलंगावर लवंडला. मुसमुसत रडत राहिला.
"अजय, तू शहाण्यासारखा ऐकणार असशील तरच मी पुढची गोष्ट सांगेन. नाहीतर जा पाहू कामाला", सोनावणे आजी अजयला लटके रागे भरत होत्या. "सांग ना आजी पुढे काय झालं", अजय आपले लाल बूट पुढे मागे हलवत आजीला विचारत होता. अॅम्ब्युलन्सचा सायरन वाजत होता. अॅम्ब्युलन्स अजयसमोर येऊन उभी राहिली. अजयने आजीचा हात सोडला व धावतच तो अॅम्ब्युलन्समध्ये चढला. अॅम्ब्युलन्समध्ये स्नेहा आडवी पडली होती. अजय तिच्या शेजारी जाऊन बसला. "तुला नीट ठेवायला काय होतं रे तुझं वॉलेट? हे घे", स्नेहाने पुढे केलेले वॉलेट अजयने हातात घेतले. अजयच्या हातात लाल भडक, रक्त गाळणारे हृदय ठोके घालत होते.
अजय दचकून जागा झाला आणि उठून बसला. त्याचे हृदय भयंकर वेगाने धडधडत होते. अंगाला दरदरून घाम फुटला होता. घर शांत होते. बाहेर रहदारीचा आवाज येत होता. अजय बेसिनपाशी गेला. त्याने तोंडावर पाणी मारले. परत येऊन पलंगावरचा फोन उचलला आणि ऑफिसचा नंबर फिरवला."सुरेश, धिस इज अजय हिअर. येस. आय वॉज. बट आय नीड सम मोअर टाइम. आय अॅम एक्स्टेन्डिंग माय लीव्ह. येस, आय विल फाइल इट. प्लीज अप्रूव्ह. नो, आय डोन्ट नो. येस, अ मंथ, मे बी मोअर. थँक्स. शुअर."
फोन बाजूला फेकत तो पुन्हा खिडकीसमोर येऊन उभा राहिला.
"आपल्या या बोधी पर्वतात? आजी, तू कशावरपण विश्वास ठेवतेस. अगं, मिथ आहे ते."
गारी, अजयची आजी, वाती वळतावळता थांबली व अजयकडे पाहत तिने विचारले, "मिथ म्हणजे?"
"मिथ म्हणजे... आई, 'मिथ'ला मराठीत शब्द काय, गं?" अजयने आईला विचारले.
"दंतकथा. अजय, तिला छळू नकोस उगाच."
"कळलं?" गारी आजीकडे पाहत अजय चेष्टेच्या सुरात म्हणाला.
"डोंबलाची दंतकथा. अरे, खरंच, अशी माची आहे, जिथे एक झोपडं आहे आणि त्यात द्विज नावाचा ऋषी गेली अनेक तपं राहतोय. त्याचेच तर शिष्य होते आपले गोविंदमहाराज. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत बघ त्या ऋषीकडे. गोविंदमहाराजांना त्यानेच दीक्षा दिली. गोविंदाय नम: गोविंदाय नम:", आजीने भिंतीवरच्या गोविंदमहाराजांच्या फोटोला मनापासून हात जोडले. अजय तावातावाने पुढे काही बोलणार इतक्यात आईने त्याला डोळ्यांनी दाबले. अजय गप्प झाला.
खिडकीच्या समोर अजय गप्प उभा होता. गारीआजीच्या वाड्यातला तो झोपाळा, ते सारवलेले अंगण, तिच्या सुरकुतलेल्या हाताचा तो मऊ स्पर्श, तिचे ते "गोविंदाय नम:" म्हणणे... अजयला भडभडून आले. आजी गेली तेव्हा अजयला जायला जमले नव्हते. कुठल्यातरी असाइन्मेन्टवर तो युरोपमध्ये होता. क्लायंट महत्त्वाचा होता. त्याच्याशिवाय डील होणार नव्हते. थांबणे भाग होते. घरी सगळ्यांनी समजून घेतले होते. अजयची समजूत घातली होती. आजी कोमामध्ये आहे, तू आलास तरी काय उपयोग? सगळं तार्किकदृष्ट्या योग्य पण... "सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत बघ त्यांच्याकडे", आजीचा आवाज अजयच्या कानाजवळ कुजबुजला. दचकून अजयने आजूबाजूला पाहिले. घर शांत होते. बाहेरून रहदारीचा आवाज येत होता.
समोरच्या टीपॉयवर स्नेहाचे मृत्युपत्र पडले होते.
"अजय या पैशांचं काय करायचं? सोन्यासारखी पोटची पोर गेली. या पैशांनी परत येणार आहे?" स्नेहाच्या वडिलांची व्याकुळता, तिच्या आईचे कोलमडून पडणे अजयला आठवले. आधार देण्यासाठी आतआतपर्यंत त्याला काही सापडले नव्हते. आवंढा गिळून त्याने पुढची इच्छा कशीबशी वाचली होती. स्नेहाने एक बरीच मोठी रक्कम बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीला देणगी म्हणून दिली होती. स्नेहाला पक्ष्यांचे वेड होते. स्नेहाला सगळ्या निसर्गाचेच वेड होते.
"अजय, बघ पटकन. हा इंडियन ग्रे हॉर्नबिल", आपली बायनॉक्युलर अजयकडे देत स्नेहा उत्साहाने म्हणाली. अजय कुणाशीतरी फोनवर बोलत होता. कसनुसा विनवणी करणारा चेहरा करत त्याने फोनच्या तोंडावर हात ठेवत ओठांनीच 'बॉस' असे म्हटले आणि पुन्हा बोलण्यात मग्न झाला. परत घरी येताना स्नेहा एक शब्दही अजयशी बोलली नव्हती.
"ओ, कमॉन स्नेहा. कशाकरता चिडली आहेस इतकी?"
"कशाकरता? राइट, आजचा दिवस दोघांनी एकत्र घालवायचा ठरवले होते. पण तुला कामापुढे काही सुचत नाही."
"अरे! असे काय करतेस. हे प्रोजेक्ट महत्त्वाचं आहे."
"आणि मी नाही? मला काही कामं नाहीत? तुला माझी आणि माझ्या वेळेची काही किंमत नाही, अजय."
"याचा आणि त्याचा काय संबंध. उगाच कुठलीही गोष्ट कुठेही ताणू नकोस. तुला आवडतं म्हणून आपण गेलो होतो."
"मी बळजबरी केली नव्हती. उपकार नाही केलेस माझ्यावर आलास ते. आधी विचारलं होतं तुला. जेव्हा काहीही ठरवायचं असतं दोघांनी करण्यासारखं तेव्हा तुला इच्छा नसते काहीही ठरवायची. मी ठरवलं की तुला इतर उद्योग सुचतात. हे असं अर्धवट मनाने काही करण्यापेक्षा स्पष्ट नाही म्हणालास तर खूप बरं होईल", स्नेहा फणकार्याने निघून गेली.
हातातल्या बायनॉक्युलरमध्ये पडलेले प्रतिबिंब न्याहाळत अजय बराच वेळ बसून होता. त्याच्या नकळत त्याने बायनॉक्युलर डोळ्यांना लावली. समोर बॅंडेजमध्ये गुंडाळलेली स्नेहा झोपली होती. नकळत त्याने हात पुढे केला. "प्लीज, इथे जवळ बस", स्नेहाला बोलायला खूप त्रास होत होता.
"एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन, यू सी.." अजयने तिचा हात हातात घेतला.
"आय हॅव नो रिग्रेट्स... आय लव्ह यू", स्नेहा सारा जीव एकवटत म्हणाली. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते. "ग्रे हॉर्नबिलांची नेहमी जोडी दिसते, अजय", स्नेहा पूर्ण कोमात जायच्याआधी बरळताना म्हणाली होती.
अजयने बायनॉक्युलर पुन्हा टेबलावर ठेवली. टेबलावर क्रेडिट कार्ड कंपन्यांची निमंत्रणे, बँकेची पत्रे, घराच्या टॅक्सचे पेपर पडले होते. समोरच्या कपाटात अजयने मिळवलेल्या ट्रॉफ्या होत्या. अजय ताडकन उठला. त्याने बायनॉक्युलर उचलली, बूट घातले, घराच्या बाहेर पडला आणि तिथेच पुतळ्यासारखा उभा राहिला. पाचेक मिनिटांनी मनाशी निश्चय झाल्यासारखा पुन्हा घरात आला. फोन उचलला आणि त्याने घरचा नंबर फिरवला. त्याला कल्पना होती अजून आईबाबा घरी पोचले नसतील. त्याने मेसेज ठेवला, "आई, बाबा, काळजी करू नका. मी एका महिन्यासाठी परगावी जात आहे. मला या एक महिन्यात कॉन्टॅक्ट करणं जमणार नाही. कुठलीही काळजी करू नका".
२.
अजयच्या पायाला चालूनचालून भेगा पडल्या होत्या. अंगावर जागोजागी खरचटले होते. आज पंधरा दिवस झाले होते. अजय या पर्वतरांगांमध्ये एकाकी फिरत होता. बोधी पर्वतातील त्या माचीचा शोध घेत होता. दोन दिवसांपूर्वी चोबेच्या झोपडीवजा हॉटेलात चहा घेताना चोबेच्या मागे लटकवलेल्या चित्राने त्याचे लक्ष वेधून घेतले होते.
"चोबे, हे कसले चित्र आहे?" अजयने विचारले.
चोबे कसनुसे हसला व म्हणाला, "काही नाही साहेब. उगाच पोरखेळ".
अजय त्याच्याकडे रोखून बघत राहिला. तसा त्यालाही कंठ फुटला. "साहेब, या भागात अशी दंतकथा आहे की ही झोपडी दक्षिणेकडच्या अतिशय दुर्गम अशा रांगेत एका माचीच्या टोकाला आहे. म्हणतात तिथे कुणी साधू अनेक वर्षे तप करत बसलाय."
"चोबे, तुमचा विश्वास दिसतो,या कथेवर."
"तसं नाही साहेब, पण हे चित्र माझ्या आज्याने काढलंय. त्याने म्हणे प्रत्यक्ष त्याच्या डोळ्यांनी पाहिली ही झोपडी. आज्याचे आशीष म्हणून लावलं आहे हे चित्र. इतकंच."
"मला माहीत आहे तिथे कसं जायचं", या दोघांचे बोलणे ऐकत बसलेल्या एका इसमाने मध्येच म्हटले.
"भोसडीच्या, गप्प राहा", चोबे त्या इसमावर खेकसला. "साहेब, वाईट शब्दाची माफी करा. पण हे आहे गांजाड. दिवसभर पडलेला असतोय इथे. दुसरा उद्योग नाही. लोकांकडून पैसे घेतो, गांजा मारून पडून राहतो. ऐकू नका याचं काही".
अजयने चोबेचे पैसे चुकते केले आणि तो बाहेर पडला. त्याच्या मागून तो गांजाडा इसमही.
"मला माहीत आहे तिथे कसे जायचे ते."
अजयने दुर्लक्ष केले. त्यानंतरही बराच वेळ तो इसम अजयच्या मागे मागे येत राहिला. अजयला काय वाटले कोण जाणे, अचानक थांबून म्हणाला, "सांग कसे जायचे तिथे?"
"काय देणार?"
"किती पैसे हवेत?"
"पैसे सगळे. त्याचबरोबर तुमचे जॅकेट, शर्ट आणि हे तुमचे बूटसुद्धा."
"वेड लागलंय का?"
तो इसम नुसताच हसला. दहाएक मिनिटांनंतर अजय थांबला. बराच वेळ तो झाडावरच्या कुठल्यातरी पक्ष्याकडे बघत राहिला आणि अचानक मागे वळून त्या इसमाला म्हणाला, "ठीक आहे. सांग".
अजय दगडाच्या आडोशाने झोपला होता. हे शरीर नवीन होते. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक श्वास वेगळा होता; मोकळा होता. स्नेहा गेली हे आयुष्याला पडलेले भगदाड कसे बुजवावे हे समजत नव्हते. प्रत्येक पानाचे, प्रत्येक पक्ष्याचे बारकाईने निरीक्षण करण्याचा चाळा लागला होता. नकळत त्याचे कान बारीक आवाज टिपत होते. रात्रीच्या काळोखात सजीव, निर्जीव या सगळ्यांमध्येच काहीकाही बदलत जाते आणि दुसर्या दिवशी उजाडलेल्या प्रकाशात लखलखणारे जग सर्वस्वी नवे, निराळे असते. अजय उठला. दूरवर पसरलेल्या पर्वतरांगांकडे त्याने पाहिले. थंडगार वार्याच्या जाणिवेने त्याने त्या इसमाने दिलेली फाटकी शाल गुंडाळून घेतली आणि तो चालू लागला.
आज पाच दिवसांनंतर तो माचीसमोर उभा होता. दूर माचीच्या टोकाला एक झोपडे होते. पण माचीची रुंदी अतिशय कमी होती. त्यावरून चालणे शक्यच नव्हते. इतक्या उंचीवर वार्याचा वेग प्रचंड होता. दोन्ही बाजूंना हजारो फूट खोल दर्या होत्या. अजयचे सगळे अवसान गळले. मनाचे सारे बांध फोडत वैफल्य दाटून आले आणि दुःखातिशयाने तो तिथेच मटकन बसला.
"सॉरी, वुई ट्राइड अवर बेस्ट", डॉक्टरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"व्हॉट डू यू मीन, यू ट्राइड युवर बेस्ट? कम ऑन, डॉक्, डू समथिंग. काहीतरी असेल, कुणीतरी असेल?" डॉक्टरांनी मान हालवली. अजयच्या डोळ्यांत साठलेल्या पाण्यात त्याच्या मुठीत असणारे आयुष्य विरघळून गेले.
"अजय, आत जा", बाबांनी त्याच्या खांद्यावर थोपटले.
"नाही जमणार मला, बाबा. काय सांगू मी तिला. कसा फेस करू?"
"राजा, मन घट्ट कर. दैवापुढे इलाज नसतो. सगळं आपल्या हातात नसतं रे!" आईने तोंडाला पदर लावत हुंदका दाबला.
अजय ताडकन उठला. दूरवर दिसणार्या झोपडीकडे जळजळीत कटाक्ष टाकत त्या माचीवर त्याने स्वतःला झोकून दिले आणि सरपटत सरपटत तो त्या झोपडीकडे सरकू लागला. दोन दिवस लागले त्याला ती माची पार करायला. अंगावरचे उरलेले कपडे फाटून गेले होते. जणू काही पहिल्या मीलनासाठी कुठलेही कृत्रिम पेहराव न घालता भेटणे अपेक्षित होते. सारे अंग जखमांनी भरले होते. या दोन दिवसांत तो एखाद्या जनावरासारखाच राहिला होता. माणसाच्या जनावर या रूपाची झालेली ही ओळख आयुष्यभर बाळगलेल्या स्वतःविषयीच्या त्याच्या कल्पनांना उद्ध्वस्त करून गेली होती. झोपडी ज्या जागेवर होती ती जागा विस्तीर्ण होती. तिथे पोचताच शक्तिपाताने अजयने जमिनीवर अंग झोकून दिले आणि गाढ झोपी गेला. जाग आली तीच मुळी पावसाच्या हलक्या सरीने. समोरच्या दगडी खळग्यात साचलेले पाणी पिऊन त्याने तहान भागवली आणि तो झोपडीच्या समोर उभा राहिला.
"तू तिला विचारणार आहेस? आज?" राहुलचा, अजयच्या मित्राचा, विश्वास बसत नव्हता.
"हो."
"मला नाही वाटत ती तुला हो म्हणेल."
"का?"
"तुझी अॅम्बिशन कॉर्पोरेट लॅडर चढायची. तिला कॉर्पोरेट वर्ल्डची किती अॅलर्जी आहे माहीत आहे ना तुला?"
"सो? ऑपोझिट्स अट्रॅक्ट हे ऐकलं आहेस ना रावल्या? आणि लग्न करशील का? हे नाही विचारणार तिला गाढवा! जस्ट अ डेट. माय फिलॉसॉफी या बाबतीत 'वाहने सावकाश हाका' अशीच आहे बे."
तो सार्या शक्यतांचा क्षण पुन्हा अजयच्या मनात तरळून गेला. आज तो गारीआजीच्या गोष्टीतील झोपडीसमोर उभा होता. काय असेल आत? प्रचंड उत्सुकतेने त्याने झोपडीत प्रवेश केला आणि तितक्याच तोलमोलाने निराशेने त्याचे स्वागत केले. आत काही नव्हते. प्रचंड संतापाने त्याने झोपडीच्या भिंतीवर लाथा घालायला सुरवात केली. तोंडाने अखंड शिव्या चालू होत्या. भावनेचा आवेग ओसरल्यावर तो बाहेर आला आणि आजूबाजूच्या शिखरांकडे पाहत जोरात ओरडला, "यू फूल". काही सेकंदांनी ती सारी शिखरे पुन्हा त्याच्यावर ओरडली, "यू फूल". अजय मोठ्यांदा हसायला लागला. त्याचे सारे त्राण संपले होते. त्याच्या हातात पुन्हा एकदा काहीच लागले नव्हते. अजयला भोवळ आली आणि तो त्या झोपडीसमोरच कोसळला.
जाग आली तेव्हा उन्हे चढली होती. बहुतेक सोसाट्याचे वादळ येऊन गेले असावे. ती झोपडी दूर फरफटून गेली होती आणि माचीच्या टोकाला अगदी पडण्याच्या बेताने उभी होती. झोपडी बांधायला वापरलेला एक बारीक दोर दगडांच्या सांदीत अडकला होता. केवळ त्याच्या आधाराने ती अजून टिकून होती नाहीतर ती कधीच खाली कोसळली असती. अजयने मागे पाहिले. इथे थांबण्यात काही अर्थ नव्हता. पण मग त्याने विचार केला, या मिथकाचा शेवट बघून जाणेच कदाचित योग्य ठरेल. "आय नीड क्लोजर", असे पुटपुटत तिथेच एका दगडावर तो वाट बघत बसून राहिला.
३.
मिनिटांचे तास झाले, तासांचे दिवस. ती झोपडी अजूनही कोसळली नव्हती. त्या एका दोर्याच्या बळावर ती उभी होती. अजयला नवल वाटले. नकळत त्याने बघ्याची भूमिका घेतली. जवळच उगवलेली करवंदं आणि पानावर साठणारे दंव, अधूनमधून पडणारी सर यांनी पोटापाण्याचा प्रश्न तसा सोडवला होता. वाट बघण्यात महिना उलटून गेला होता. घरचे काळजी करत असतील, एक विचार येऊन गेला. एकापाठी दुसरा, दुसर्यापाठी तिसरा. तो त्रयस्थपणे विचारांकडे पाहत होता. ऋतू बदलत होते. जोरदार वार्यांचा ऋतू संपला. पावसाचा ऋतू आला आणि गेला. पण तो इवलासा दोर हार मानायला तयार नव्हता. झोपडी अजूनही उभीच होती. पावसाच्या ऋतूनंतर आला बहराचा ऋतू. झोपडी अजूनही तग धरून होती. आज सहाएक महिने होत आले होते.
अचानक एक निळा पक्षी घुमटदार शीळ घालत त्या झोपडीवर उतरला. अजयकडे तो बराचवेळ बघत बसला होता. त्यानंतरच्या दिवसांत त्या पक्ष्याने त्या झोपडीच्या छपरावर एक घरटे बांधले. काही दिवसांनी त्यात दोन अंडी घातली. अजय हे सगळे पाहात होता. याचा काय अर्थ लावावा हेच त्याला समजत नव्हते. काही दिवसांनी त्या अंड्यांतून दोन इवले राखाडी रंगाचे जीव बाहेर आले आणि त्यांच्या किलबिलाटाने ती माची भरून गेली. कुठल्यातरी अनामिक आनंदाची जाणीव अजयला होत होती. तो पक्षी रात्रंदिवस त्या पिलांसाठी चारा आणत होता. अजयच्या लक्षात आले दोन पिलांत एक पिलू आडदांडपणाने सगळा चारा घेत होते व भराभर वाढत होते तर दुसरे कमजोर होत चालले होते. अचानक अजयच्या काळजात धस्स झाले. "यातले एकच जगणार", तो स्वतःशीच पुटपुटला. काहीतरी करायला हवे. दुसर्या कमकुवत पिलाला वाचवायला हवे. त्याची उलाघाल चालली होती. एके दिवशी या अस्वस्थतेत तो झोपडीच्या दिशेने निघाला आणि "सगळं आपल्या हातात नसतं रे!" हे आईचे शब्द ऐकून जागीच थबकला. स्नेहा गेली, गारी गेली, आता हे पिलू जाणार. एक दीर्घ श्वास घेत तो मागे फिरला आणि त्या अटळ क्षणाची वाट पाहत बसून राहिला. एका दुपारी त्या आडदांड पिलाने धक्का दिल्यानंतर एक हृदय पिळवटणारी शीळ घालत ते कमजोर पिलू खालच्या खोल दरीत फेकले गेले. अजयने डोळे मिटले. त्या कोसळणार्या पिलाची प्रत्येक भावना त्याला समजत होती. काही वेळाने त्याचे सारे शरीर खालच्या दगडावर आदळल्याचा भास त्याला झाला. सारे संपले. त्याने डोळे उघडले. समोर तो निळा पक्षी त्या उरलेल्या पिलाला चारा भरवत होता. एक पिलू कमी आहे हे त्याच्या गावीसुद्धा नव्हते. डोळ्यांच्या कडेला साचलेले पाणी अजयने पुसले.
बहराचा ऋतू संपत आला होता. येणार्या सोसाट्याच्या वार्यांच्या ऋतूची चाहूल लागायला लागली होती. अजयला त्या दोराची कंपने समजत होती. हा शेवटचा ऋतू. घरट्यातील पिलू आता चांगलेच मोठे झाले होते. घरट्याबाहेर तासन्तास ते बसून राहत असे पण अजूनही ते उडायचा प्रयत्न करत नव्हते. अजयच्या मनाची उलाघाल होत होती. याने उडायला हवे. नाहीतर याचाही शेवट... अजयचे मन धजत नव्हते... आयुष्यावर स्वार होण्याची इतकी सवय अजूनही मोडत नव्हती. हे पिलू उडाले नाही तर तो बघ्याची भूमिका सोडणार हे स्वतःलाच बजावायचा प्रयत्न करत होता. पण आज मन ते ऐकत नव्हते. सोसाट्याचा वारा सुटला होता. कोणत्याही क्षणी तो दोर तुटणार. अजयच्या काळजात धस्स झाले आणि दोर तुटला. त्या झोपडीच्या कोसळण्याबरोबर ते पक्ष्याचे पिलूदेखील कोसळत होते. त्या पिलाची आई वर घिरट्या घालत शीळ घालत होती.
अजयने डोळे मिटले. अजयच्या आयुष्याला बांधून ठेवणारा स्नेहा नावाचा दोर तुटला. अजय आयुष्यावर बेफिकीरपणे बसला होता. सगळे संपले होते आणि अचानक कुठूनतरी अजयच्या मनाला पंख फुटले. एका अनामिक शांततेने त्याला बुडवून टाकले आणि त्याने आपले दोन्ही हात फैलावले. आपल्या अंगाखाली दूर दूर जाणार्या झोपडीकडे एकदा पाहिले आणि त्याला तरंगल्याची जाणीव झाली. समोर मोकळे आकाश होते आणि नकळत त्याच्या चोचीमधून एक घुमटदार शीळ बाहेर पडली. अजयच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. ते निळे पिलू आपल्या पहिल्या उड्डाणात आसमंत काबीज करायला निघाले होते.
अजय अत्यानंदाने त्याच्याकडे पाहत ओरडला, "हे ऋषी द्विजा, तुला माझा प्रणाम!"
काही सेकंदांनी एकापाठोपाठ एक शिखरांतून उत्तर आले, "हे ऋषी द्विजा, तुला माझा प्रणाम!"
अजय स्तंभित होऊन ऐकत होता. साक्षात्काराचा क्षण असेल तर तो असाच, याची एक वेगळीच जाणीव त्याच्या मनात होत होती. स्नेहाचे जाणे एक मिथक बनून पुन्हा जन्माला येत होते.
1 comment:
नमस्कार!
माझं नाव किमंतु आहे. मी आनंदऋतू ई-मॅगझिनचा संपादक आहे. आज आपला ब्लॉग वाचनात आला. आवडला. आपली परवानगी असेल तर आपली मिथक ही कथा आणि वावर ही कविता आनंदऋतू ई-मॅगझिनच्या माध्यमातून प्रकाशित करण्याची इच्छा आहे. आपली इच्छा असल्यास कृपया खालील ईमेलवर संपर्क साधावा ही विनंती.
-किमंतु
वेबसाईट:http://aanandrutu.com/
साहित्य पाठवण्यासाठी ईमेल: aanandrutu@gmail.com
फेसबुक पेज: https://www.facebook.com/Aanandrutu
Post a Comment