पंखपार: 2012

Thursday, July 19, 2012

वारूळ

पावलांचे  मुंगळे निघाले
त्या वारुळातील योगी मंत्रामागून मंत्र उसवत राहील
तर नागवे होणाऱ्या शरीराची कुठली असेल पोळणारी जात?
मांडी घालून म्हणता येतात सहिष्णू शब्दरचना
त्याच वेळी निराकार जनावर वेटोळे (? ) घालून 
रचत असते जहरोत्तम द्वंद्वगीत...
सहज मनाच्या गाभाऱ्यातील समईची जखम
रुंदावायला लागली की
एखादी पालखी हमखास येते
भोयांच्या खांद्यावरून अनेक समाप्तीच्या कथा पायउतार होतात
पाठ वळवून, ती धून ऐकण्यासाठी 
देवळे मिटून घेतात शयनगृहाचे दरवाजे
असहायपणे हेलकावे घेत राहते बाहेर कडी
एक... दोन... तीन
अस्वस्थ कोपऱ्यातील एखादे पिवळे वय
स्वतःची कुरवाळू लागते..
ती भूक नागडी नसते...
सर्व विझायला लागले की वाटांवर कुलुपे कशी लागतात?
रांगेतले सर्वजण एकाच खिडकीकडे पायांना मिठी घालून सरपटत राहतात...
एक एक अवयव खाटीक वेगळा करतो 
वाहणार स्राव आढेवेढे घेत नाही..
पाणलोटात जिवाच्या आकांताने मदत मागणाऱ्या कुणाची एक डॉक्युमेंट्री...
रीळ गुंडाळले जाते...
जाणिवा देखील
ह्या साऱ्यांच्या मागे एक वेडसर दिवा
तटस्थपणे
फडफडत असतो....

Friday, June 29, 2012

हे कसे? ते कसे? विचारू नकोस

हे कसे? ते कसे? विचारू नकोस
जे बोलले जात नाही त्या ठिकाणी
एखादे वारूळ आहे...
समज  अपसमजाच्या कवड्या घेऊन खेळलेले हे डाव
पोहताना, नदीचे विशाल पात्र चिरायची जिद्द घेऊन हात चालवत नव्हतो.
मासे जगतात तसा जगायचा प्रयत्नही नव्हता...
केवळ कसल्याशा फाटकेपणाला
आकांताने टाके घालत होतो.
शब्दावर वजन देऊन बसलो आहे.
तू येतेस तेव्हा फडफड होते
मग तू पंख देतेस नेहमीच
हे वजन त्यांच्या मानेवर जाड झालेलं आभाळ आहे
एकमेकापासून काहीतरी चोरताना
आपण एकमेकात रुतत गेलो की रुजत?
ही फुले वितळून गेली आहेत...
दिवस पिळून काळा रस सगळी कडे उतरला आहे...
चित्रावती नंतर हातांना कालवण्यासाठी 
तू शरीर वाढवून, सजवून ठेवले आहेस.
मचामचा जेवणाऱ्या अनेक क्षणांची पंगत कर्कशं आहे.
माझ्या गावात समुद्र नाही.
तुला सामावून उसळण्या इतकी माझी खोली नाही.
ह्या कागदावर उन्हाळ्यातील वाळवणासारखी
पसरवून ठेवली आहेत अटीतटीची सारी द्वंद्वे
खोली आवरतेस तसे एकदा माझे सारे रकाने स्वतःपुढे धर
तुझा स्पर्श झालेले सारे शुभ्र होते...
ओझे होते कसे म्हणू?
तुझी काळी सावली विणायची खूप इच्छा आहे..
हे कसे? ते कसे? विचारू नकोस!

Tuesday, April 3, 2012

प्रार्थना


प्रार्थनेचे हात जुने होत नाहीत, विटत नाहीत, विरत नाहीत
धोकादायक वस्तूंची विल्हेवाट कशी लावतात?
चंद्र उगवलेल्या रात्रीत मल्हार ऐकताना
पाऊस बनून कोसळावेसे वाटते आहे
माझी म्हणावी अशी जमीन उरलेली नाही
माझे म्हणावे असे आकाश उरलेले नाही
वीजा, ढग, सोसाट्याचा वारा ह्यांचा वरखर्च...
रकाने मारलेल्या मन-देहाला झंकारणे झेपणार की नाही?
रात्र उलटताना पुन्हा पुन्हा त्याच दिवसापाशी सोडते
उजेडाची भुक, उजेडाची तहान
घनघोर पसरलेले उजेडाचे रान
उजेडाची श्वापदे त्यांचे स्वप्न-भक्षी दात
उजेडाची भिती मागते माझे प्रार्थनेचे हात...
दिसू लागतो राक्षस श्रद्धेमागे मेलेला
ऐकु येतो शोक मला प्रार्थनेने गाडलेला...
अशावेळेस हात जोडू?
कुणासमोर जोडू?
कसे जोडू ?
का जोडू?
ह्या चंद्र उगवलेल्या रात्रीत
मल्हार ऐकताना वाटते आहे पाऊस व्हावे
माझ्या ह्या प्रार्थनेला पुन्हा कोणावर कोसळण्याआधीच
काही ओलाव्याचे आयाम मिळावे?