पंखपार: 2009

Sunday, July 26, 2009

पत्र

शब्दांची जळते काया
मन सैरभैर अनावर
गर्द काळ्या डोही
हलते एकट घागर

घन दाट पसरले वरती
दुख्खाचा पहिला गंध
एका कवडशापाई
मन तुडवत जाते काच

मोगरा जपणारे हात
खुडतात कोवळी देठे
मायेच्या स्पर्षा आधी
मन दाबुन घेते ओठ

शब्दांना गोडी कसली?
जबड्यात विषाचा दात
मन कात टाकण्या आधी
शिकते दंशाचा घाव

शब्दांची जळते काया
मन सैरभैर अनावर
थरथरणार्‍या हाती
पत्राची होते राख....

Monday, March 30, 2009

जरा सांगाल का?

दुख्खातील सृजनशील नागडेपणानंतर
सुखातगुंडाळलेली अनुभवशुन्यता
भोगुन पांगळे झालेल्यांनो
कुठल्या कुबड्या वापरता
जरा सांगाल का?
समाधी शिकवणारा कुणी
भेटला नाही ह्याची खंत नाही
समाधी म्हणुन प्रत्येकाची
आत्महत्या पुजनीयही होत नाही
तुम्हीचालता आहात
तिरस्काराने थुंकावे तशी
आता माझीही पाउले त्याच रस्त्यावर
गुळगुळीतपणाची थोबाडित खाउन
कोडगे झालेले सारे शब्द कुठे डागु?
एखादा बामियान बुद्ध ठिकरला महणजे?
आत्मदिमाखाचे सांडपाणी संपलेल्याम्न्नो
तुमचे हौद कुणापुढे धरता
जरा सांगाल का?

Thursday, January 1, 2009

प्रदेश

तुझे हात नाग गळ्याभोवताली
सुर-केवड्याचे रान बहरुन आले

देहवाटेवरी मिठीचा चकवा
हरवणे सापडावे नव्याने जिवघेणे

सुखाचा बसे काळजास दंश
शरीरावरी शरीर ठीणगी सोसणारे

विष-वादळानंतर उरे दगडदेह
अन मन पिसापरी तरंगणारे

चांदणे रमावे असा हा प्रदेश
स्पर्षांच्या समेवर निष्वास सांडणारे